सत्तार, तुमचे सगळे रंग मी पाहिलेले आहेत  - रावसाहेब दानवे

..
sattar Danve
sattar Danve

भोकरदन: सत्तार यांनी नुकताच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारीही मिळवली. तेव्हापासून सत्तार यांच्यावर भगव्या रंगाचा भलताच प्रभाव पडला आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारासाठी त्यांनी आपली अख्खी गाडीच भगव्या रंगाने रंगवली.

हे कौतुक दाखवण्यासाठी सत्तार रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्यावर गेले होते. सत्तार मोठ्या मिजाजीत भगव्या रंगाने रंगवलेली गाडी दानवेंना दाखवत होते, तेव्हा आपल्या हजरजबाबासाठी प्रसिध्द असलेल्या दानवेंनी "सत्तार मला काय रंग दाखवता, म्या तुमचे सारे रंग पहायेल हे' असा जोरदार टोला लगावला.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री तथा जालन्याचे खासदार आणि सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील कॉंग्रेसचे माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्याती मैत्री व त्याचे किस्से राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चिले जातात. गेली तीन दशके या दोन नेत्यांनी राजकारणापलीकडची आणि राजकारणाच्या पडद्या मागची "दोस्ती' जपली आहे. भाजप प्रवेशासाठी आसुसलेल्या सत्तार यांना जेव्हा मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला, तेव्हा देखील दानवे आपल्या मित्राच्या मदतीला धावून आले होते.

"पक्ष वाढवायचा असेल तर अस करावंच लागतं गड्या हो' अशी समजूत देखील त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काढली होती. लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंना मदत करण्यासाठी पंधरा हजार मतदान नोटाला करायला लावून सत्तार यांनी देखील आपले मित्रप्रेम व्यक्त केले होते. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध झाल्यानंतर त्यांना शिवसेनेत जाण्याचा मोलाचा सल्ला देखील दानवे यांनीच दिला होता अशी देखील चर्चा आहे.

या सगळ्या राजकीय घडामोडीत सत्तार यांनी भोकरदन येथील रावसाहेब दानवे यांचा बंगला आणि त्यांची भेट सोडला नव्हता. आता शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर निवडणुकीत अधिकृतपणे सत्तार यांना मदत करण्याची संधी रावसाहेब दानवे यांना चालून आली आहे. सत्तार देखील दानवे यांच्या सल्यानेच पाऊले टाकतांना दिसत आहेत.

सिल्लोड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या सत्तार यांनी चागंलीच आघाडी घेतली आहे. अगदी संपुर्ण मतदारसंघच त्यांनी भगवामय करून टाकला आहे. प्रचाराच्या निमित्ताने मतदारसंघात फिरण्यासाठी सत्तार यांनी आपल्या गाडीला खास भगव्या रंगात रंगवून घेतले आहे. यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे यांना देखील स्थान देण्यात आले आहे.

ही भगव्या रंगाने रंगवलेली गाडी घेऊन सत्तार दानवे यांना भेटण्यासाठी गेले होते. रावसाहेबांनी देखील ही गाडी न्याहाळली, सत्तार दाखवू पाहत असलेला रंग चाणाक्ष दानवे यांच्या लगेच लक्षात आला. तिथे उपस्थितीत पदाधिकारी कार्यकर्त्यांसमक्षच दानवे यांनी सत्तार यांना टोला लगावण्याची संधी हेरली आणि उपस्थितांनी दादांच्या या दादागिरीला हसून जोरदार प्रतिसादही दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com