raosaheb danave criticizes ncp | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या घड्याळाने राज्याची तिजोरी उघडणार नाही : रावसाहेब दानवे

जयसिंग कुंभार
मंगळवार, 24 जुलै 2018

सांगली : सांगली महापालिकेतील प्रश्न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाहीतर उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा देऊ शकतो, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

सांगली : सांगली महापालिकेतील प्रश्न सोडवण्यासाठी येणारा पैसा नीट वापरला नाहीतर उपयोग होणार नाही. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे सांगलीतही सत्तेची चावी भाजपकडे दिली तर राज्यातील तिजोरी उघडली जाईल. तुम्ही घड्याळाला चावी दिली तर राज्याची तिजोरी उघडणार नाही. भाजपच खऱ्या अर्थाने नागरी सुविधा देऊ शकतो, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

 
येथील भावे नाट्य मंदिरात बुथप्रमुख आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश हाळवणकर, जि.प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. दानवे म्हणाले, "सांगली हा वसंतदादांचा जिल्हा आहे. दुर्दैवाने दादांच्यानंतर जिल्ह्याची अवस्था बकाल झाली असून ती लपून राहिली नाही. त्या काळात कॉंग्रेसची ताकद होती. नंतर राष्ट्रवादीने शिरकाव केला. वटवृक्षाप्रमाणे वाढलेले प्राबल्य जनतेने उखडून फेकले. राज्यात 13 महापालिका भाजपच्या ताब्यात आहेत. दहा जिल्हा परिषद, पाच हजार सरपंच आणि 80 नगरपरिषदा ताब्यात असलेला भाजप एक नंबरचा पक्ष आहे. राज्यात जळगाव आणि सांगली महापालिकेची निवडणूक लागली आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचा झेंडा फडकेल.''

 
ते पुढे म्हणाले, "आमच्यावर टीका करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला एका स्टेजवर येण्याचे आव्हान आहे. 68 वर्षात तुम्ही काय केले आणि आम्ही चार वर्षात काय केले? याचा फैसला होईल. परंतू ते आव्हान स्विकारायला तयार नाहीत. आमच्यावर जातीयवादाचा आरोप करणारे विकासाचा अजेंडा रोखू शकत नाहीत. दलित-सवर्णात भांडणे लावण्याचा उद्योग करत आहेत. डॉ. आंबेडकरांचा दोनवेळा पराभव करणाऱ्या कॉंग्रेसला दलित मतदान करणार नाहीत.''

 
महसूलमंत्री पाटील म्हणाले, ""निवडणुकीत तिकिट मिळाले नाही म्हणून अनेक नाराज झालेत. परंतू नाराजी झटकून कामाला लागा. भविष्यात संधी मिळू शकते. तुमच्या नाराजीचा पक्षांवर, नेत्यांवर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्या.'' 
सहकारमंत्री देशमुख म्हणाले, ""प्रचारात रॅली व पदयात्रा काढून फक्त वातावरण निर्मिती होत असते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचून प्रचार करा. भाजपा हा सत्ता मिळवून विकास करणारा पक्ष आहे.'' 

खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नीता केळकर, शेखर इनामदार आदींची भाषणे झाली. काही अपक्ष उमेदवारांनी भाजपला पाठिंबा देत प्रवेश केला. माजी महापौर विवेक कांबळे, मकरंद देशपांडे, दीपक शिंदे, राजाराम गरूड आदी उपस्थित होते. 

मुंबईचे तोंड बघणार नाही- 

माजी उपमहापौर शेखर इनामदार म्हणाले, ""निवडणुकीसाठी गेले अडीच वर्षे झटतोय. त्यामुळे अडीच वर्षात मुंबईचे तोंडही बघितले नाही. भाजपचा महापौर झाल्यानंतर त्यांना घेऊनच मुंबईला जाईन. तोपर्यंत मुंबईचे तोंड बघणार नाही.'' बोलतानाच त्यांना गलबलून आल्यामुळे भाषण आटोपते घेतले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख