राणेंनी लायकी काढलेले शरद रणपिसेच "खरे सिनिअर'!

धन्य ते "रणपिसेसाहेब'!राणेंनी गटनेतेपदाबाबत केलेल्या टिकेसंबंधी रणपिसे यांनी खुलासा केला आहे. "मी 17 ऑक्‍टोंबर 2015 ला गटनेता झालो आणि राणे 8 जुलै 2016 ला परिषदेचे सदस्य झाले. मी अगोदरच गटनेता असल्याने त्यांना गटनेतेपद दिले नाही, असे म्हणणे उचित ठरत नाही', असे रणपिसे यांनी म्हटले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राणेंनी कॉंग्रेस सोडली असलीतरी आपला उल्लेख आदराने "रणपिसेसाहेब' असे केल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रणपिसेंचा विधीमंडळ कामकाजाचा अनुभव मोठा आहे. रणपिसे यांच्या भाषेवरही संसदीय कामकाजाचा प्रभाव आहे. मात्र राणे आपल्याबद्दल आदराने बोलतात, हे सांगून रणपिसेंना काय साध्य करायचे आहे? हे समजून येत नाही. रणपिसेचा काय अभ्यास ? काय बोलतो ? कधी निवडून आला ? असे थेट एकेरी उल्लेख राणेंनी केले. यात रणपिसेंना कसला आदर दिसतो ? राणे भाषणात एकदा "रणपिसेसाहेब' म्हणाले हे खरे पण त्यात आदर होता की अन्य भाव, हे तपासण्याची गरज आहे.
 राणेंनी लायकी काढलेले शरद रणपिसेच "खरे सिनिअर'!

पुणे: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल सिंधुदुर्गमध्ये कॉंग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर करत असताना विधान परिषदेत गटनेतेपद दिले नसल्याबाबतचा त्रागा व्यक्‍त केला होता. आपण सिनीअर असताना अशोक चव्हाण यांनी आपणाला डावलल्याचा आरोप करत गटनेते शरद रणपिसे यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण केले होते. मात्र विधीमंडळात रणपिसे हेच राणेंना "सिनिअर' असल्याचे वास्तव आहे. 

राणे कॉंग्रेसमध्ये नाराज असल्याच्या बातम्या गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होत्या. राणे यासंदर्भाने ठोसपणे बोलत नव्हते. मात्र पंधरा दिवसांपासून राणेंच्या नाराजीची कारणे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समोर येत होती. त्यात मुख्यत: विधान परिषदेतील गटनेतेपदाचा विषय होता. राणेंना गटनेतेपद हवे होते, मात्र त्यांना ते मिळाले नाही, याची सल त्यांच्या मनात होती. मी माझी मुख्यमंत्री असताना रणपिसेंची परवानगी घेऊन बोलायचे कां?, असा त्यांचा सवाल होता. राणेंनी त्यांना विचारावे, इतपत पात्रतेचे रणपिसे नाहीत, अशी त्यांची भूमिका होती. गुरुवारी तर राणेंनी कॉंग्रेस सोडण्याची घोषणा करत असताना मनातील खदखद बोलून दाखविली. 

राणे यांनी सांगितल्यानुसार, त्यांना विधान परिषद सदस्य करण्यास अशोक चव्हाण यांचा विरोध होता. मात्र राहूल गांधींनी त्यांना आमदार केले. राणे परिषदेत आल्यानंतर त्यांना चौथ्या क्रमांकाची जागा मिळाली. माजी मुख्यमंत्री असल्याने पहिल्या बाकाची जागा त्यांना अपेक्षित होती. महत्त्वाची बाब म्हणजे कॉंग्रेसने गटनेतेपद मिळावे, असे त्यांना वाटत होते. गटनेतेपद दूरच, पण बसण्यासाठी जागा चौथ्या क्रमांकाची जागा दिली गेल्याने राणेंना वाईट वाटले. त्याचवेळी आपला उपयोग नसल्याचे लक्षात आल्याचे राणे सांगतात. 

यासंबंधीचा राग व्यक्‍त करताना राणेंनी "रणपिसेंचा अभ्यास काय? बोलतो काय?' असे त्यांना दुय्यम लेखणारे शब्द वापरले होते. रणपिसेंच्या क्षमतेवर थेट हल्ला चढवत असताना आपली सिनिऑरिटी व क्षमता अधोरेखित केली होती. रणपिसे कधी निवडून आला कां पुण्यातून, असा प्रश्‍नही राणेंनी केला होता. "मला वाटेल तेव्हा बोलणार, मी परवानगी मागत बसणार नाही', असे रणपिसेंना म्हटल्याचे राणेंनी सांगितले होते. 

प्रत्यक्षात सिनिऑरिटीचा मुद्दा राणेंच्या विरोधात जातो आहे. राणे हे माजी मुख्यमंत्री असलेतरी विधीमंडळात रणपिसे हेच राणेंना सिनीअर आहेत. रणपिसे हे पहिल्यांदा 1985 साली पुण्यातील पर्वती (अनुसूचित जाती) मतदारसंघातून कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 1990 ला ते पुन्हा पर्वतीमधूनच आमदार झाले. महत्त्वाची बाब नारायण राणे 1990 ला मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार झाले. 5 वर्षे राणे व रणपिसे हे दोघे एका सभागृहात होते. राणेंना रणपिसे हे 5 वर्षे सिनीअर असताना आता राणे "रणपिसे कधी निवडून आला कां', हा प्रश्‍न विचारतात, हे विशेषच आहे. विधान परिषदेतही रणपिसे राणेंना सिनीअरच आहेत. राणे परिषदेत येण्यापुर्वीच रणपिसे हे गटनेते होते. पण प्रश्‍न आहे राणेंच्या सिनिऑरिटीचे निकष कोणते आहेत याचा ? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com