सहयोगी पक्षाचा नेता म्हणून राणेंना मंत्रिपद? : भाजपमध्ये प्रवेश नाहीच!

सहयोगी पक्षाचा नेता म्हणून राणेंना मंत्रिपद? : भाजपमध्ये प्रवेश नाहीच!

मुंबई : नारायण राणे यांचा सहयोगी पक्षाचा सदस्य म्हणून मंत्रीमंडळात समावेश करण्याचा निर्णय भाजपच्या धुरीणांनी घेतला असून राणे प्रकरणी कॉंग्रेस, शिवसेना आणि राणे असे एका दगडात तीन पक्षी मारण्याची कमाल भाजपने केलयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या मुद्यावर भाजपने राणे यांना ताटकळत ठेवून त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी केली. पक्षप्रवेशासाठी राणे यांनी अनेक अटी भाजपसमोर ठेवल्या होत्या. भाजप प्रवेशासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दिल्लीत काल राणे यांनी भेट घेतली. मात्र या भेटीत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी स्वतंत्र राजकीय पक्ष किंवा संघटना काढण्याशिवाय राणे यांच्यासमोर पर्याय नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नव्या राजकीय पक्षाची घोषणा राणे यांच्याकडून होण्याची शक्‍यता आहे. नारायण राणे यांना थेट पक्षात प्रवेश दिल्यास शिवसेनेच्या असंतोषाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तोंड द्यावे लागले असते. 

शिवसेनेसोबत अजूच सव्वा दोन वर्षे राज्याचा गाडा हाकायचा असल्याने सेनेला नाराज न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे धोरण आहे. त्यामुळे महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्या धर्तीवर नारायण राणे यांचा सहयोगी पक्षाचा सदस्य म्हणून मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्‍यता आहे. यामुळे शिवसेनेचा विरोध कमी होईल, असा भाजपला विश्‍वास आहे. दुसरीकडे नारायण राणे यांना कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याची परिस्थिती निर्माण करून कॉंग्रेसच्या ताकदीला सुरूंग लावण्यात भाजप यशस्वी झाल्याचे मानण्यात येते. या पार्श्वभूमीवर राणे यांचे राजकीय महत्व करण्याबरोबरच शिवसेनेचा विरोध क्षीण करून कॉंग्रेसची ताकदही कमी करण्याची भाजपची रणनिती यशस्वी झाल्याचे मानण्यात येते.

राणे यांची विधानपरिषदेवर वर्णी

सहयोगी पक्षाचा सदस्य म्हणून नारायण राणे यांचा मंत्रीमंडळात समावेश केल्यास त्यांना आमदार करण्याची कामगिरी भाजपला करावी लागणार आहे. यासाठी कॉंग्रेसचे आमदार म्हणून राजीनामा दिलेल्या विधानपरिषदेतील रिक्‍त जागेवर त्यांना निवडून द्यावे लागेल. ही जागा विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाची आहे. विधानसभेत भाजपचे 122, शिवसेना 63, कॉंग्रेस 42, राष्ट्रवादी कॉंग्रेस 41 आणि अन्य 20 असे संख्याबळ आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्यास राणे पराभूत होवू शकतात. मात्र राणे यांना निवडून आणण्याची जबाबदारी भाजपवर असल्याने राजकीय घडामोडींना काही दिवसातच वेग येणार असल्याची चर्चा आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com