rane and patil clip problem | Sarkarnama

राणे क्‍लीपप्रकरण : पाटील व राणे यांच्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

परळी येथील आंदोलनातील नेते सरकारकडे पैसे आणि महामंडळांची मागणी करत असल्याचा उल्लेख या कथीत ऑडीओ क्‍लिपमध्ये होता. यामुळे समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

बीड : मराठा आंदोलनातील नेते सरकारकडे पैसे आणि महामंडळांची मागणी करत असल्याचा उल्लेख असलेली आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथीत संभाषणाची क्‍लिप शुक्रवारी व्हायरल झाली आणि समाजात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, यावरुन दोघांविरोधात शनिवारी परळी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. 

आमदार नितेश राणे व रुपाली पाटील यांच्यातील कथीत संभाषणात परळी येथील आंदोलक सरकारकडे पैसे आणि महामंडळांची मागणी करीत असल्याचा उल्लेख आहे. सदर क्‍लिप शुक्रवारी समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने याची मोठी चर्चा झाली. दरम्यान, हे बदनामीचे षडयंत्र असून आंदोलन स्थगित करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. 

समाजातील प्रतिमा मलीन करण्यासह समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी हा प्रकार केला आहे. यामुळे माझ्यासह कुटूंबांच्या जिवीतास धोका असल्याचे आबासाहेब पाटील यांनी म्हटले. या विषयाचे पुरावे असतील तर समाजासमोर ठेवावेत, पोलीस प्रशासनाने या सर्व प्रकरणाची चौकशी करून रूपाली पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करावा व तिला अटक करावे, तसेच पोलिस संरक्षणाची मागणीही करण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि आरक्षणाचा ठोस निर्णय होईपर्यंत मेगा भरती थांबवावी यासाठी आंदोलने सुरुच आहेत. परळी येथील ठिय्या आंदोलनाचा अठरावा दिवस आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख