ramtek-mallikarjun-reddy | Sarkarnama

रामटेकमधून पुन्हा मीच लढणार आणि जिंकणार : मल्लिकार्जुन रेड्डी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 30 एप्रिल 2019

"रामटेक विधानसभा मतदारसंघातून मीच पुन्हा विधानसभा निवडणूक लढविणार असून जनता जनार्दन मलाच पुन्हा निवडून देणार अशी मला खात्री आहे," असे भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

पुणे : "रामटेक विधानसभा मतदारसंघातून मीच पुन्हा विधानसभा निवडणूक लढविणार असून जनता जनार्दन मलाच पुन्हा निवडून देणार अशी मला खात्री आहे," असे भाजपचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

आमदार मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले, "आगामी विधानसभा निवडणूक मी लढविणार नाही असे मी काडीचा म्हणालेलो नाही. माझे विरोधक आणि त्यांचे बगलबच्चे माझ्याविषयी खोट्या अफवा पसरवत  आहेत. माझया पक्षाने मला आदेश दिला की मी आगामी विधानसभा निवडणूक लढविणारच आहे. मी विद्यमान आमदार असल्याने पक्ष मला पुन्हा संधी देईल अशी मला खात्री आहे. भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या सहकार्याने मी पुन्हा मतदारांची सेवा करण्यासाठी नक्कीच लढणार आहे. "

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे मला चांगले सहकार्य आहे. मी माझ्या आमदारकीच्या काळात आदिवासींच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. माझ्या मतदारसंघात अनेक नव्या योजना राबविल्या आहेत," असे सांगून आमदार मल्लिकार्जुन रेड्डी पुढे म्हणाले, "भाजपमध्ये इतके सक्षम कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्यामुळे आम्हाला बाहेरून नेते आयात करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आशिष जैस्वाल १५ वर्षे आमदार होते. पण त्यांनी काही विकास केला नाही, म्हणून गेल्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना पराभूत करून घरी बसवले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मीच पुन्हा लढविणार आणि समोर कोणीही असले तरी जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा निवडून येणार आहे."

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी १२ हजार ८१ मताधिक्याने विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेचे आशिष जैस्वाल यांचा पराभव केला होता. जैस्वाल यांना ४७ हजार २६२ मते पडली होती तर काँग्रेसचे सुबोध मोहिते यांना ३५ हजार ५४८ मते पडली होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख