रामटेकमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

रामटेक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नसल्याने लढत तीन पक्षांतच झाली होती.
रामटेकमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी

नागपूर : रामटेक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची उमेदवारी मिळविण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. गेल्या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि कॉंग्रेस स्वतंत्र लढले होते. राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नसल्याने लढत तीन पक्षांतच झाली होती. शिवसेनेचे तत्कालीन आमदार आशिष जयस्वाल यांचा पराभव करुन भाजपचे डी. एम. रेड्डी निवडून आले. यावेळी भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्‍यता आहे. अशा स्थितीत विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळेल, असे मानले जाते. तरीही आशिष जयस्वाल यावेळी रामटेकवर दावा करतील, असे जाणकार सांगतात. याशिवाय जिल्हा परीषद उपाध्यक्ष शिवसेनेचे शरद डोणेकर संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरतील.

भाजपमधून अविनाश खळतकर, माजी जिल्हा परीषद उपाध्यक्ष सदानंद निमकर, योगेश वाडीभस्मे आणि कमलाकर मेंघर इच्छुक आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीकडून माजी मंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल देशमुख, पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव उदयसिंह यादव आणि ज्येष्ठ जिल्हा परीषद सदस्य शांता कुमरे यांचा इच्छुकांच्या यादीत समावेश आहे. प्रहारकडून रमेश कारेमोरे आणि अपक्ष म्हणून शेतकरी नेते संजय सत्येकार तयारी करीत आहेत.

डी. एम. रेड्डींनी पारशिवनी नगरपंचायत, कन्हान आणि रामटेक नगर परीषदेमध्ये सत्ता मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चुका दुरुस्त करीत नव्या दमाने कार्यकर्ते जोडून पक्षबांधणी केली. सर्वपक्षीय लोकांची कामे आपल्या परीने करीत लोकांमध्ये स्थान टिकवून ठेवले आणि मैदानात उतरणार असल्याचा संदेश दिला.

शिवसेनेचे जिल्हा परीषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनीही लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. जिल्हा परीषद निवडणूक आधी झाली तर लढायची आणि त्यानंतर विधानसभा पण लढायची किंवा विधानसभा निवडणूक आधी झाली तरी आपण निश्‍चितपणे लढणार असे त्यांनी `सरकारनामा'ला सांगितले. जिल्हा परीषदेचा अतिरीक्त कार्यकाळ मिळाल्यामुळे आपली तयारी चांगली झाली असल्याचे ते म्हणाले.

रामटेकमध्ये युती आणि आघाडीतच लढत होणार, हे निश्‍चित. इच्छुकांना आधी तिकीटाची लढाई जिंकावी लागेल. तिकीट न मिळाल्यास प्रमुख पक्षांतील कीती जण अपक्ष म्हणून मैदानात उतरतात, हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com