रामटेक लोकसभा : विधानसभा निवडणुकीत भाजपला किमान तीन उमेदवार बदलावे लागणार

रामटेकमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसमध्ये घडलेले नाट्य आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी बजावलेली निर्णायक भूमिका बघता यंदा विधानसभेत अनेकांचे हिशेब चुकते होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभेत पाच जागा जिंकणाऱ्या भाजपलाही किमान दोन ते तीन उमेदवार बदलल्याशिवाय आपल्या जागा कायम राखणे मुश्‍कील होणार आहे.
रामटेक लोकसभा : विधानसभा निवडणुकीत भाजपला किमान तीन उमेदवार बदलावे लागणार

रामटेक - रामटेकमध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी कॉंग्रेसमध्ये घडलेले नाट्य आणि राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांनी बजावलेली निर्णायक भूमिका बघता यंदा विधानसभेत अनेकांचे हिशेब चुकते होण्याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभेत पाच जागा जिंकणाऱ्या भाजपलाही किमान दोन ते तीन उमेदवार बदलल्याशिवाय आपल्या जागा कायम राखणे मुश्‍कील होणार आहे. 

रामटेक लोकसभेमध्ये मुकुल वासनिक यांनी माघार घेतल्यानंतर माजी मंत्री तसेच अ. भा. अनुसूचित जाती-जमाती विभागाचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी या जागेवर दावा केला होता. त्यांना सावनेरचे आमदार सुनील केदार यांचे पाठबळ होते. त्यामुळे राऊत नकोच, याकरिता वासनिक अडून बसले होते. यात ते यशस्वीसुद्धा झाले होते. राहुल गांधी यांच्यापर्यंत हा संघर्ष पोहोचला होता. मतदानानंतरही अंतर्गत धुसफूस कायम आहे. निकालानंतर ती अधिकच वाढणार असून, पडद्याआड आणि प्रचारात घडलेल्या घडामोडींचे पडसाद विधानसभेच्या वेळी निश्‍चितच बघायला मिळणार आहेत.
 
रामटेक विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जात होता. युती तुटल्याने तो उद्‌ध्वस्त झाला. भाजपने आयात केलेल्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी शिवसेनेचे आशीष जयस्वाल यांना पराभूत केले. रेड्डी मूळचे कंत्राटदार आहेत. त्यांचा स्वभाव व वागणूक लोकप्रतिनिधींना साजेशी नसल्याची ओरड आहे. पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याची जाणीव झाली असल्याने रेड्डी यांनी आपण पुढील निवडणूक लढणार नसल्याची घोषणा आधीच केली आहे.

दुसरीकडे, पराभूत झाल्यानंतर आशीष जयस्वाल भाजपच्या जवळ गेले. ते केव्हाही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे. पुन्हा युती झाल्यास तेच उमेदवार राहतील. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक बऱ्याच दिवसांपासून सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. याकरिता त्यांनी रामटेकची निवड केली आहे. दोन वर्षांपासून त्यांनी आपला मुक्काम नागपूरमधून रामटेकला हलविला आहे. त्यामुळे काही स्थानिक कॉंग्रेसचे इच्छुक त्यांच्यावर नाराज आहेत. मात्र, त्यांच्या विरोधाची कोणी फारशी दखल घेईल, असे चित्र नाही. पर्यटनमित्र चंद्रपाल चौकसे यांनी वासनिकांशी चांगलीच जवळीक साधली आहे. त्यांचे "पर्यटन' कितपत यशस्वी होते हे आताच सांगणे कठीण आहे.

आरक्षित होण्यापूर्वीच्या उमरेड मतदारसंघात भाजपची चांगलीच पकड आहे. आमदार सुधीर पारवे यांनी सलग दोनदा उमरेड जिंकले. मात्र, त्यांच्याविरोधात जनतेचा प्रचंड रोष असला, तरी कॉंग्रेसला अद्याप प्रबळ नेतृत्व येथे उभे करता आलेले नाही. मुकुल वासनिकांचा शब्द चालल्यास माजी जिल्हा परिषद सदस्य तक्षशीला वागधरे यांचे नशीब फडफडू शकते. 

कामठी विधानसभा मतदारसंघात राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. येथून लढण्यास कॉंग्रेसचा एकही नेता फारसा मनापासून इच्छुक नाही. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर यांचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चांगलेच सख्य आहे. जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या नावाची आधीच घोषणा केल्याने मध्यंतरी चांगलाच वाद उद्‌भवला होता. मात्र, त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय कॉंग्रेसला दिसत नाही.

सावनेर मतदारसंघ सुनील केदार यांनी मोदी लाटेतही कायम राखला आहे. मात्र, ते सातत्याने बंडखोराच्याच भूमिकेत असतात. त्यांचा मित्र कोण आणि शत्रू कोण, हे भल्याभल्यांना समजत नाही. भाजपचाही त्यांच्याविषयी "सॉफ्ट कॉर्नर' असल्याचे बोलले जाते. मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. त्यामुळे ते तरल्याचे बोलले जाते. वासनिकांशी उघड पंगा घेतल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकसभेत वासनिकांनी ते काम करीत नसल्याने अमोल आणि आशीष देशमुख या दोन्ही भावांना कामाला लावले होते. यापैकी एकाची लॉटरी लागू शकते. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार लढण्यास इच्छुक असले, तरी जातीय समीकरण ही त्यांची प्रमुख अडचण आहे. शेवटच्या क्षणी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश मानकर यांच्या नावाची घोषणा झाल्यास कोणाला आश्‍चर्य वाटणार नाही. 

भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी राजीनामा देऊन काटोल मतदारसंघावर आधीच पाणी सोडले आहे. त्यांनी काका अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाऊ शकतो. मात्र, त्यांच्याकडे देशमुखांना पराभूत करू शकेल एवढे प्रभावी नेतृत्व नाही. भाजपतर्फे चरणसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे, संदीप सरोदे, अविनाश खडतकर, उकेश चव्हाण आशा लावून बसले आहेत. 

हिंगणा मतदारसंघात भाजपचे आमदार समीर मेघे यांनी राष्ट्रवादीची ताकद संपविली आहे. माजी लोकप्रतिनिधी व राष्ट्रवादीचे नेते रमेश बंग आता थकले आहेत. त्यांच्याकडील कार्यकर्त्यांची फौज भाजपकडे वळती झाली आहे. सातत्याने येत असलेल्या अपयशामुळे कॉंग्रेसचे नेते नाना गावंडे, माजी जि. प. अध्यक्ष सुनीता गावंडे यांचेही दुर्लक्षच आहे. त्यांचेही आता येथे फारसे वर्चस्व राहिले नाही. कुंदा राऊत येथून लढल्या होत्या. शिवाय, आघाडीत राष्ट्रवादी दावा ठोकण्याची शक्‍यता असल्याने फारसे कोणी सक्रिय दिसत नाहीत. 

- कॉंग्रेसमध्ये उत्साह, युतीला विजयाची अपेक्षा 
- आमदारांच्या कामगिरीवर विधानसभेची उमेदवारी 
- सोशल मीडियावरच रंगतेय चर्चा 
- राहुल गांधी यांच्या सभेचा फायदा 
- सावनेर व काटोल भाजपसाठी प्रश्‍नच  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com