ramraje`s no comments on bjp entry | Sarkarnama

भाजप प्रवेशाच्या चर्चेवर रामराजेंचे नो कॉमेंटस्! 

उमेश भांबरे
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी भाजप प्रवेशावर फक्त नो काॅमेंटस अशी प्रतिक्रिया दिली आहे. आपण राष्ट्रवादीसोबत किंवा पवार साहेबांसोबतच असल्याचे तरी त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नो काॅमेंटसचे अनेक अर्थ घेतले जात आहेत.

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजप प्रवेशानंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रवेशाची चर्चा सध्या जोमात आहे. पण त्यांनी अद्याप तरी कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्व गोष्टी चर्चेच्याच असल्याचे सांगत रामराजे नाईक निंबाळकर यांनी `नो कॉमेंटस्‌` म्हणत सर्वांनाच बुचकळ्यात टाकले.  

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यात भाजप प्रवेशाचे वारे वाहत आहे. याचा सर्वाधिक फटका कॉंग्रेस व राष्ट्रवादीला बसला आहे. बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आहे.

आतापर्यंत भाजपमध्ये गेलेल्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांमध्ये माजी आमदार मदन भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पाचगणीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर, लोणंद नगरपंचायतीचे पदाधिकारी, आदींचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावरून चर्चा सुरू आहे.

याबाबत सातत्याने सोशल मिडियावर प्रवेशांच्या तारखांसह मजकूर काही कार्यकर्त्यांकडून व्हायरल होत आहे. आज यासंदर्भात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा भाजप प्रवेश येत्या 22 ऑगस्टला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे, अशी पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. पूर परिस्थितीत मागे पडलेला हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

यावर रामराजेंनी मात्र, यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सर्व गोष्टी केवळ चर्चेच्याच असल्याचे सांगत नो कॉमेंटस्‌ म्हणून सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही गुलदस्त्यातच लपल्याचे दिसत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख