रामराजे आता हाती धनुष्यबाण घेणार का ?

 रामराजे आता हाती धनुष्यबाण घेणार का ?

फलटण : आम्ही शेवटपर्यंत राष्ट्रवादीसोबतच राहू, असा शब्द जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी दिल्यानंतर आज पहिल्यांदा फलटणमध्ये राजे गटाचा युवा संवाद मेळावा होत आहे. त्यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या भुमिकेकडे लागले आहे. 

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय झाल्यापासून फलटणच्या राजे गटामध्ये अस्वस्थता आहे. या निवडणुकीनंतर विरोधी कार्यकर्त्यांना फलटण तालुक्‍यात पाठबळ मिळत आहे. त्यातूनच फलटण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून आणण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. या पार्श्‍वभूमीवर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप किंवा शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांत जोर चढला होता. त्यातच मध्यंतरी फलटणमध्ये झालेल्या राजे गटाच्या मेळाव्यात "शरद पवार हे आमचे दैवत आहेत, परंतु, मतदारसंघाच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घ्यावा लागेल,' असे रामराजेंनी म्हटले होते. त्यामुळे राजे गटाचा काय निर्णय होणार, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. 

त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सातारा दौऱ्याच्या नियोजनात राजे गटाचे प्रतिनिधित्व नव्हते. परंतु, सभास्थळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांनी हजेरी लावली. त्या वेळी संजीवराजेंनी ठाम भूमिका मांडत राष्ट्रवादीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राजे गटाचा निर्णय काय असणार, हे समोर आले होते. परंतु, रामराजेंची भुमिका ठाम नसल्याने कार्यकर्त्यांत अद्यापही संभ्रमाचे वातावरण आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपायला पाच दिवस राहिले आहेत. तरीही पक्षाचा निर्णय न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. बहुतांश कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत राहावे, असाच सूर आहे. याच पार्श्‍वभूमीवर फलटणमध्ये आज राजे गटाच्यातर्फे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामध्ये रामराजे काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com