ramraje nimbalkar and ncp | Sarkarnama

माझ्या अटी वेगळ्या, मी राष्ट्रवादीसोबतच : रामराजे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

सातारा : फलटणचे राजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप, शिवसेनेत जाण्याचा विचार बदलून अखेर राष्ट्रवादीसोबतच राहणे पसंत केले आहे. गेली दोन दिवस त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पुण्यात आणि मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. माझ्या वेगळ्या अटी असून त्यासंदर्भात मी पवारसाहेबांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता मी राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

सातारा : फलटणचे राजे व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप, शिवसेनेत जाण्याचा विचार बदलून अखेर राष्ट्रवादीसोबतच राहणे पसंत केले आहे. गेली दोन दिवस त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी पुण्यात आणि मुंबईत भेट घेऊन चर्चा केली. माझ्या वेगळ्या अटी असून त्यासंदर्भात मी पवारसाहेबांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता मी राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. 

माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेमुळे त्रस्त झालेले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंना आवरा अन्यथा आम्हाला दुसऱ्या पक्षात जाण्याची परवानगी द्या, असे सांगितले होते. मात्र, कोणत्याही परवानगीची वाट न पाहता शिवेंद्रसिंहराजेंनी मतदारसंघाच्या विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. तर रामराजेंनी मात्र, पक्ष प्रवेशाची घाई केली नाही. सुरवातील ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा सुरू होती. 

भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी वाई, फलटण आणि कुलाबा हे तीन मतदारसंघांची मागणी केली होती. त्याच दरम्यान, त्यांचे वैरत्व असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचीही भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्यांनीही काही अटींवर भाजपमध्ये जाण्याची तयारी केली. या अटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्याने त्यांनी रामराजेंच्या आधी भाजपमध्ये प्रवेश केला. ज्यांच्यामुळे त्रस्त झाले तेच भाजपमध्ये गेल्याने रामराजेंनी आपली भुमिका बदलली. त्यांनी शिवसेनेत जाण्यासाठी चर्चा सुरू केली. 

अगदी उध्दव ठाकरेंपर्यंत त्यांची चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. पण रामराजेंनी आपले पत्ते शेवटपर्यंत उघड केले नाहीत. युतीच्या जागा वाटपात भाजपने शिवसेनेच्या वाट्यातील वाई, माण आणि फलटणमध्ये उमेदवार देताना फलटण मतदारसंघ युतीचे मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला सोडला. तेथून छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजे याला उमेदवारीही जाहिर केली. तसेच वाईतून भाजपचे मदन भोसलेंना तिकिट दिल्याने रामराजेंच्या मागणीकडे भाजपने फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याचे स्पष्ट झाले. 

भाजप व सेनेत जागा वाटपातून निर्माण झालेल्या तिढ्यामुळे लोकसभेसह तिन विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे रामराजेंनी आपला शिवसेनेत जाण्याचा पर्याय थांबवून अखेर राष्ट्रवादी सोबत राहणे पसंत केले. त्याच दरम्यान काल राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या यादीत फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे रामराजे राष्ट्रवादीसोबतच राहणार हे निश्‍चित झाले. दरम्यान गेल्या दोन तीन दिवसांपूर्वी रामराजेंनी पुण्यात व मुंबई राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये त्यांनी आपल्या काही वैयक्तिक अटीही श्री. पवार यांच्यापुढे मांडल्या. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीसोबतच राहणार असे सांगून टाकले. यासंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी माझ्या काही वेगळ्या अटी असून त्यासंदर्भात मी श्री. पवार यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख