रामप्रसाद बोर्डीकरांचा भाजप प्रवेश निश्‍चित

 कॉंग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार कुंडलिकराव नागरे, मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आदी उपस्थित होते.
कॉंग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार कुंडलिकराव नागरे, मेघना बोर्डीकर, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आदी उपस्थित होते.

परभणी ः जिल्ह्यातील कॉंग्रेसचे बडे नेते तथा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश निश्‍चित झाला आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा परभणीत प्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्या सोबत जिल्हयातील कॉग्रेसचे अन्य नेतेही भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी 'सकाळ' शी बोलतांना दिली. दरम्यान, परभणी महापालिकेची सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून श्री.बोर्डीकर यांचा फायदा भाजपला होण्याची शक्‍यता आहे. 


परभणी जिल्ह्यात कॉंग्रेसचे बडे नेते म्हणून माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्याकडे पाहिले जाते. जिंतूर विधानसभेवर सलग चार वेळा ते निवडून आले होते. कॉग्रेसमधून वेगळा गट पडून जेव्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस स्थापन झाली होती. त्यावेळी श्री.बोर्डीकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गेले होते. परंतू तेथे त्यांचे मन रमले नाही. परत ते कॉंग्रेस मध्ये आले. 
नुकत्याच झालेल्या जिंतूर विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. कॉंग्रेसकडून बोर्डीकर उभे होते तर राष्ट्रवादीकडून विजय भांबळे यांनी त्यांचा पराभव केला होता. बोर्डीकर आणि भांबळे यांच्यात अजिबात जमत नाही, हे सर्वश्रुत आहे आणि कॉंग्रेसमध्ये राहून भांबळेला टक्कर देणे अवघड असल्यामुळेच त्यांनी भाजपसारखा सत्ताधारी पक्ष निवडला आहे. भाजपत राहून परभणी जिल्ह्याची धुरा आपल्या हाती घेण्याचा त्यांचा मानस आहे. कारण परभणी जिल्ह्यात माजी आमदार विजय गव्हाणे वगळता एकही मोठा नेता भाजपमध्ये नाही. त्यामुळेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे (कै) गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे संबंध घनिष्ठ होते. त्यामुळे त्या काळात देखील त्यांनी कधी छुप्या तर कधी उघड पद्धतीने त्यांना मदतीचा "हात' दिला होता. भाजपला देखील अशा तुल्यबळ नेत्याची गरज होतीच. ती बोर्डीकरांच्या मुळे पूर्ण झाली आहे. 


जिल्हा परिषद निवडणुकीतही त्यांचा फारसा करिष्मा चालला नाही. ते कॉंग्रेस सोडणार अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून होत होती. त्यांचे निकटवर्तीय असलेले प्रभाकर वाघीकर हे शिवसेनेत गेल्यानंतर रामप्रसाद बोर्डीकर हे देखील शिवसेनेत येणार असल्याची चर्चा होत होती. आता श्री. बोर्डीकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून होत होती. दोन दिवसापूर्वीच त्यांनी त्यांची कन्या मेघना साकोरे - बोर्डीकर यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार कुंडलिकराव नागरे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील (अहमदपूर) यांच्यासह अन्य काही नेते उपस्थित होते. 

आपला भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला आहे. या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट ही घेतली आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री परभणी येथे येतील त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत आपला प्रवेश सोहळा होईल. माझ्या सोबत परभणी जिल्ह्यातील कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करतील असे श्री बोर्डीकर यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com