Ramkrishnababa Met Sharat Pawar At Aurangabad | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सातारा : साताऱ्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांची तडकाफडकी बदली. त्यांच्या जागी रत्नागिरीचे सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे घ्या, रामकृष्ण बाबांनी घेतली शरद पवारांची भेट

जगदीश पानसरे 
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

शरद पवार बुधवारी शहरात आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पवारांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सायंकाळी हॉटेलात परतल्यावर रामकृष्ण बाबा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. वीस पंचवीस मिनिट या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 

औरंगाबादः गेली वीस-पंचवीस वर्ष औरंगाबाद लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पराभूत होत आली आहे. राज्यात सध्या सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विरोधात वातावरण असल्यामुळे औरंगाबादची जागा राष्ट्रवादीने लढवली तर या मतदारसंघात विजय मिळू शकतो, असा विश्‍वास व्यक्त करत औरंगाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीने लढवावी अशी आग्रही मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन केली. 

शरद पवार बुधवारी शहरात आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन पवारांनी त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर सायंकाळी हॉटेलात परतल्यावर रामकृष्ण बाबा पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. वीस पंचवीस मिनिट या दोन नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. 

या संदर्भात 'सरकारनामा' प्रतिनिधीने रामकृष्ण बाबा पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पवारांसोबत झालेल्या भेटीला दुजोरा दिला. ते म्हणाले, ''पवारांशी झालेल्या चर्चेत निश्‍चितच औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा आणि तो राष्ट्रवादीने आपल्याकडे घ्यावा हा विषय झाला. सातत्याने काँग्रेसचा पराभव होत असल्याने आता ही जागा राष्ट्रवादीने लढवावी आणि निवडून आणावी, असा आग्रह मी त्यांच्याकडे धरला.'' 

''शरद पवार यांनी देखील यावर सकारात्मकता दाखवली. औरंगाबाद लोकसभा निवडणूक मी दोनवेळा लढलो. पंचवीस वर्षापुर्वी माझ्या रुपाने काँग्रेसला या मतदारसंघात विजय मिळाला होता. त्यानंतर सातत्याने औरंगाबादमध्ये काँग्रेस उमेदवाराचा पराभव होत गेला. त्यामुळे काँग्रेसने ही जागा म्हणेज आपली वतनदारी आहे असे न समजात राष्ट्रवादीला द्यावी अशी माझी मागणी आहे. तशी इच्छा मी शरद पवारांकडे बोलून दाखवली." असेही त्यांनी सांगितले. 

''काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी देखील या विषयावर माझी चर्चा झाली आहे. पण त्यांनी काँग्रेसचा उमेदवार निवडून कसा येईल, यासाठी आपण प्रयत्न करू असे मला सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असल्याने शरद पवारांनी आघाडीच्या बोलणीत औरंगाबादची जागा राष्ट्रवादीसाठी मागून घ्यावी अशी विनंती मी त्यांना केली आहे." अशीही माहिती रामकृष्णबाबा यांनी दिली. 

पैशाच्या जोरावर जिंकता येत नाही..
औरंगाबाद लोकभेसाठी काँग्रेसमध्ये सध्या सुभाष झांबड यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण केवळ पैसा आहे म्हणून कोणी निवडून येऊ शकत नाही हे काँग्रेसच्या नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. केवळ प्रयोग न करता निवडूण येणार उमेदवार आणि पक्षाला संधी देऊन राज्यात काँस-राष्ट्रवादी आघाडीच्या विजयी उमेदवारांची संख्या कशी वाढेल यावर नेत्यांनी भर देण्याची वेळ आली असल्याचे मत देखील रामकृष्ण बाबा पाटील यांनी व्यक्त केले. 

सरकारनामा दिवाळी अंक 2018 - आजच मागणी नोंदवा - अॅमेझाॅनवर सवलतीच्या दरात अंक - येथे क्लिक करा
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख