निवडणूक सुप्रिया सुळेंची पण दौंडमध्ये कसोटी रमेश थोरात यांची!

निवडणूक सुप्रिया सुळेंची पण दौंडमध्ये कसोटी रमेश थोरात यांची!

केडगाव :  बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांच्यात लढत होणार असली तरी ही निवडणूक दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची कसोटी पाहणारी ठरणार आहे. आमदार राहुल कुल यांची सत्ता व कांचन कुल यांची स्थानिक उमेदवारी राष्ट्रवादीने गांभीर्याने घेतल्याचे चित्र आहे. 

आमदार राहुल कुल व माजी आमदार रमेश थोरात हे दोघे राष्ट्रवादीत असताना नेत्यांपर्यंत परस्परांबद्दल अनेक तक्रारी होत असायच्या. याचा त्रास कार्यकर्त्यांनाही होता. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत कुल यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि थोरात गटाने सुस्कारा टाकला. तेव्हापासून थोरात हेच दौंड राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा झाले. साहजिकच गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीचे जे काही भलेबुरे होईल त्याची जबाबदारी थोरात यांच्यावर येऊ लागली. 

गेल्या विधानसभेला राहुल कुल यांच्याकडून 11 हजार 345 मतांनी पराभव झालेले रमेश थोरात पुन्हा जोमाने कामाला लागले. बाजार समिती, दौंड नगरपरिषद व जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणुकीत थोरात यांनी विधानसभेचे अपयश धुवून काढले. जिल्हा परिषद निवडणुकीत दौंड राष्ट्रवादीला तालुक्यात 28 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. कुल यांच्या या अपयशाला भीमा पाटस कारखान्याचे कामकाज कारणीभूत ठरले. कारखाना एक वर्ष बंद राहिला. परंतु ही चूक कुल यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी  मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करीत कारखान्याला मदत मिळवून तो पुन्हा चालू केला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना दौंड तालुक्यातून 25 हजाराचे मताधिक्य मिळाले. ही बाब राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागलेली आहे. निवडणुकीनंतर जानकर यांनी दौंड तालुक्याशी संपर्क ठेवला नाही तर या उलट सुळे यांनी संपर्क वाढवला. तालुक्यात जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ, पंचायत समिती या संस्थावर राष्ट्रवादी व पर्यायाने रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे सुळे यांना आघाडी देण्यासाठी रमेश थोरात यांची मोठी धडपड चालू आहे.  भीमा पाटस कारखान्याचे कामकाज, सरकारवरील नाराजी, सुप्रिया सुळे यांनी केलेले काम हे लोकांपर्यंत घेऊन जाणे व त्यातून सुळे यांना मताधिक्य देणे यासाठी थोरात व त्यांच्या सहकार्यांची कसोटी लागणार हे नक्की. लोकसभेच्या निकालावर विधानसभेची समीकरणे अवलंबून असतील.   

 निवडणुकीबाबत रमेश थोरात म्हणाले, ``गेल्या पाच वर्षात सुळे यांनी विकासकामातून तालुक्यात मोठा निधी आणला आहे. मोदी लाट आता राहिली नाही. सरकार व भीमा पाटस काऱखान्यावरील नाराजीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाने तालुक्यात 28 हजाराचे मताधिक्य घेतले आहे. हा मोठा बदल गेल्या पाच वर्षात झाला आहे. या बदलामुळे राष्ट्रवादीच्या आशा उंचावल्या आहेत. दौंड तालुक्यात सुळे यांना 25 हजाराचे मताधिक्य राहिल. आघाडी सरकार व युतीचे सरकार यांच्यातील फरक जनतेला समजला असल्याने सुळे या अडीच ते तीन लाख मतांच्या फरकाने विजयी होतील असा विश्वास आहे. 

जिल्हा बँकेची बक्षिसी

दौंड तालुक्यात गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी पिछेहाट झाली. तालुक्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी रमेश थोरात गेल्या पाच वर्षापासून पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावर कायम ठेवले आहे. जिल्ह्यातील महत्वाचे पद असल्याने थोरात यांच्याकडून पक्षाच्या अपेक्षा आहेत. बँकेच्या माध्यमातून शेतक-यांची कामे केल्याचा दावा थोरात करीत आहेत. मात्र याचे प्रतिबिंब लोकसभा निवडणुकीत उमटते की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com