... तर रमेशअप्पा आज आमदार असते : अजित पवार

मी महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्ही स्वतः उमेदवार झालात. प्रथमच तालुक्‍यातील शंभर टक्के बूथवर लीड देऊन सातव्यांदा आमदार केले. -अजित पवार
Ajit_Pawar
Ajit_Pawar

सोमेश्वरनगर :  "दत्तात्रेय भरणे यांनी माझ्या पाच-पाच सभा घेतल्या. रमेश थोरात यांनाही म्हणत होतो, बघा राव काट्याची टक्कर आहे. इतकं नाही पण थोडं बहुत तरी लोकं माझं ऐकतात. पण ते गहाळ राहिले. माझं ऐकलं असतं तर आज रमेशअप्पा आमदार असते,'' अशी मिश्‍किली माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. 

 "पुरंदरचे महाराज (विजय शिवतारे) सारखेच साहेब, सुप्रिया विरुद्ध  बोलायचे . म्हणून म्हणलं, कसा निवडून येतोय तेच बघतो.  अन पुरंदरच्या जनतेनं ते ऐकलं,'' असे इंगितही त्यांनी उलगडले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम प्रारंभ कार्यक्रमात आयोजित सभेत ते बोलत होते. या प्रसंगी 'सोमेश्वर'च्या कार्यक्षेत्रातील नवनिर्वाचित आमदार संजय जगताप, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, आमदार दत्तात्रेय भरणे आदी उपस्थित होते.

"जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महाआघाडीला कौल दिला याबद्दल जिल्ह्यातील जनतेचे आभार. दौंडला साहेबांची मोठी सभा झाली. मात्र, त्यानंतर मी आलोच अशा भावनेत अप्पा गहाळ राहिले. दौंडमध्ये गेल्यावर पुढाऱ्यांच्याच गावात कसं मागं राहिलो ते सांगणार आहे,'' असा इशारा पवार यांनी दिला.

इंदापूरमध्ये ऐन निवडणुकीत अप्पासाहेब जगदाळे, विजय निंबाळकर, संजय निंबाळकर, भाऊसाहेब सपकळ विरोधात गेले. मामांना पाहिजे तेवढ्या सभा दिल्या, साहेबांची मेहनत लोकांनी बघितली आणि मामांचा संपर्क यामुळे विजय सुकर झाला.

पुरंदरच्या महाराजांना (विजय शिवतारे) म्हणायचो, आमच्यावर घसरा पण साहेब, सुप्रिया यांनी तुमचं काय घोडं मारलंय? जनतेने संजय जगताप यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडून दिले. कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करू नये याची काळजी घेतली. भोरमध्येही त्यामुळे फायदा झाला,'' असे ते म्हणाले.


सामान्य घरातल्या मुलाने ... 
कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात आले, तेव्हा राज्याचे कृषिमंत्री अनिल बोंडे विजयाची खात्री सांगत होते. जागावाटपात राष्ट्रवादीने ती जागा स्वाभिमानीला दिली. राजू शेट्टी यांनी देवेंद्र भुयार या शेतकऱ्याच्या मुलाला उमेदवारी दिली. 
लोकांनी निवडणूक हातात घेतल्याने त्याचा विजय झाला, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव व माण-खटावच्या जागा गेल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

प्रत्येक बूथवर मताधिक्‍य
मुंबई-दिल्लीला गेल्यावर तेथील लोक आणि इंग्रजी वृत्तपत्रेही, सगळ्या विरोधकांची अनामत जप्त करून राज्यात 1 लाख 65 हजाराच्या उच्चांकी मतांनी निवडून आल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त करतात. 

मी महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्ही स्वतः उमेदवार झालात. प्रथमच तालुक्‍यातील शंभर टक्के बूथवर लीड देऊन सातव्यांदा आमदार केले. बारामतीकरांच्या मेहनतीने सत्तेची दारं उघडली म्हणून तुमचे लाख लाख आभार. थोडी उसंत मिळताच प्रत्येक गावात अडचणी समजून घेण्यासाठी येणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com