रमेश आडसकरांना फडणवीसांकडून प्रसादात काय मिळणार ?

 रमेश आडसकरांना फडणवीसांकडून प्रसादात काय मिळणार ?

बीड : तीन मतदार संघात ताकद असली तरी त्यांच्या हक्काचा केज विधानसभा मतदार संघ राखीव असल्याने रमेश आडसकर यांची मोठी अडचण आहे. रमेश आडसकर यांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी पंकजा मुंडे यांनी दोन वेळा ताकद लावली. मात्र, राज्याच्या राजकीय समीकरणात त्यांना संधी मिळाली नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आडसकरांसाठी कुठला तोडगा काढतात याकडे लक्ष लागले आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर जिल्ह्यातील भाजपसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची शुक्रवारी सकाळी हजेरी होती. नेमकी गणपती आरतीची वेळ होती. यावेळी रमेश आडसकर यांनाही आरतीचा मान मिळाला. यानंतर हा नेत्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या रॉयलस्टोन बंगल्यावर जाऊन त्यांच्याही गणपतीचे दर्शन घेतले. आता दोघांचा गणपती आडसकर यांना कोणता प्रसाद देणार याची चर्चा आडसकर समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. 

लोकसभेच्या 2009च्या निवडणुकीत प्रथमच दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे लोकसभेच्या मैदानात उतरले होते. मुंडेंसारखे मातब्बर नेते मैदानात असल्याने राष्ट्रवादीतील पहिल्या फळीतले नेते उमेदवारीवरुन एकमेकांकडे बोट दाखवू लागले. त्यावेळी रमेश आडसकर यांनी निवडणुक लढविली. यावेळी दोघांमधील लढतीची राष्ट्रीय पातळीपर्यंत चर्चा झाली. या निवडणुकीत दिवंगत गोपीनाथराव मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाले. तर, पराभूत उमेदवारांत देशात सर्वाधिक मते घेण्याचा विक्रम रमेश आडसकर यांनी केला. 

या निवडणुकीत दोन्ही उमेदवारांनी एकमेकांवर वैयक्तीक आरोप केले नाहीत हे विशेष. पुढे दिवंगत मुंडेंनीही अनेक वेळा भाषणात ही गोष्ट बोलून दाखविली. दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी रमेश आडसकर पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये आले. त्यांचा केज विधानभा मतदार संघ राखीव असल्याने त्यांना परिषदेवर संधी देण्याचा शब्द श्रेष्ठींकडून दिला गेला. तसे, दोन वेळा त्यांच्या नावासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आग्रह धरुन ताकदही लावली. परंतु, राज्याच्या समिकरणात परिषदेच्या यादीत आडसकरांचे नाव फिट बसू शकले नाही. 

दरम्यान, बाजार समिती, पंचायत समिती, सहकारी साखर कारखाना, शाळा - महाविद्यालये आणि कार्यकर्त्यांचे जाळे अशी आडसकर यांची ताकद आहे. केज, अंबाजोगाई, परळीआणि धारुर तालुक्‍यात त्यांचे चांगले राजकीय वजन असल्याने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत भाजपला मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, आडसकर यांच्या अधिपत्याखालील अंबा सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र परळी मतदार संघात असल्याने पंकजा मुंडे यांच्यासाठीही राजकीय फायद्याचेच गणित आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com