सरकारने नाही बनवले तर जनताच राम मंदिर बनवेल - स्वामी रामदेवबाबा

सरकारने नाही बनवले तर जनताच राम मंदिर बनवेल - स्वामी रामदेवबाबा

नांदेड : देशाची श्रद्धा असल्यामुळे राम मंदिर झालेच पाहिजे. तो काही राजकीय पक्ष नाही. सरकारने त्यासाठी कायदा करावा, अन्यथा जनताच राम मंदिर बनवेल, अशी परिस्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही अपेक्षा पूर्ण करतील, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर जगभरातील दोनशेहून अधिक देशांनी योगाला स्वीकारले असून रोग आणि हिंसामुक्तीसाठी योग आवश्‍यक आहे. सत्ताधाऱ्यांनीदेखील योगाचे स्वागत केले असून आता विरोधी पक्षांनीही योग करावा. विरोधक संख्याबळात जरी कमजोर असले तरी योगाने त्यांचेही सत्ताधाऱ्यांसारखे मनोबल आणि आत्मबल वाढेल, असा सल्ला स्वामी रामदेव बाबा यांनी दिला. 

जागतिक योग दिनानिमित्त रामदेव बाबा नांदेडला गुरुवारी (ता. ) आल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न केले आणि ते सुद्धा दररोज योगा करत असल्यामुळे 18 तास काम करत आहेत. विपक्षांनीदेखील निपक्ष बनण्याचा सल्ला मोदी यांनी दिला असून विरोधकांनीदेखील योगाला स्वीकारावे, असा सल्ला देत योगाच्या माध्यमातून विरोधकांचेदेखील मनोबल निश्‍चितच वाढेल, असे सांगितले. एवढेच नाही तर सर्वांनीच दररोज एक तास योग केला तर निश्‍चितच प्रत्येकजण रोगमुक्त आणि तणावमुक्त होईल आणि औषधांवर जगभरात जे करोडो रुपये खर्च होतात ते वाचतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

पतंजली योगपीठाच्या माध्यमातून योगासोबतच आयुर्वेद, स्वदेशीचा प्रचार प्रसार घरोघरी करण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले की, योग सगळ्यांसाठीच आवश्‍यक असून तो सर्वधर्मसमभाव जपण्याचाही प्रयत्न करत आहे. सगळ्याच जाती, पंथातील लोक आता योगाकडे वळू लागले आहेत. पाकिस्तानमध्येदेखील योग सुरू झाला असून योगाभ्यास ही एक चांगली जीवनपद्धती आणि अद्‌भुत अशी गोष्ट आहे. 365 दिवस योग करण्याचा पतंजली योगपीठाचा संकल्प असून जागतिक योगदिनी देशभरातील चार कोटींहून अधिक; तर जगभरातील 15 कोटींहून अधिक लोक योग करतील, अशी शक्‍यताही त्यांनी व्यक्त केली. प्रसारमाध्यमात काम करणाऱ्यांनीदेखील आरोग्यसंपन्नेतेसाठी योग करावा, असेही त्यांनी सांगितले. 

" काले धन' बाहेर आलेच पाहिजे, त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून "काला मन'देखील चांगले होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतच असल्याचे सांगून रामदेवबाबा यांनी वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आता संतती नियमनाचा कायदा कोणत्याही परिस्थितीत 2024 पर्यंत व्हायला हवा. दोनच मुले हवीत आणि त्यापेक्षा जास्त झाली तर त्याबाबतीत निर्बंध आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. या वेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. 

मैं तो फकीर संन्यांशी आदमी हूँ..... 
पतंजली योगपीठ आणि विविध उत्पादन तसेच त्यांच्या विक्रीतून होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या नफ्याबाबत प्रश्न विचारले असता रामदेवबाबा यांनी " मैं तो फकीर संन्यांशी आदमी हूँ, मुझे कोई मोह नही' असे उत्तर दिले. जे काही आम्ही करत आहोत ते देशासाठी करत आहोत. त्यात कुणाचाही व्यक्तिगत स्वार्थ नाही. सर्व विदेशी कंपन्यांशी मी संन्यांशी माणूस लढत असून तुम्ही माझे कौतुक करू नका. पण निदान तिरस्कार तरी करू नका, अशी अपेक्षा व्यक्त करत मी गेल्या 40 वर्षांपासून कार्यरत असून महाराष्ट्रात सर्वात जास्त वेळ दिला आहे व प्रत्येक जिल्ह्यात मी गेलो असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com