RAMDAS ATHWALE BELONGS TO WHOM? | Sarkarnama

रामदास आठवले नक्की कोणाचे : रिपब्लिकन कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर संभ्रमात

मयुरी चव्हाण- काकडे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

कल्याण :  "ज्या दिशेने हवा असेल त्या पार्टीची साथ देणार" असे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  केले आहे. त्यामुळे आधीच  पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते  आठवले यांच्या वक्तव्यामुळे अधिकच बुचकळ्यात पडले आहेत.

कल्याण :  "ज्या दिशेने हवा असेल त्या पार्टीची साथ देणार" असे विधान केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी  केले आहे. त्यामुळे आधीच  पक्षाच्या बदलत्या भूमिकेमुळे संभ्रमात असलेले कार्यकर्ते  आठवले यांच्या वक्तव्यामुळे अधिकच बुचकळ्यात पडले आहेत.

लोकसभा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला प्रारंभ झाला आहे. मात्र आरपीआयच्या भूमिकेबाबतच संभ्रमाचे वातावरण असून नेमकी कोणावर टीका करायची? मित्रपक्ष कोण आणि विरोधक कोण? अशा एक ना अनेक प्रश्न कार्यकर्त्यांसमोर घोंघावत आहेत. त्यामुळे आठवले नक्की कुणाचे? या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

सोशल मीडियावर सध्या राजकीय चिखलफेक जोरात सुरू असून  कार्यकर्त्यांमध्ये सोशल वॉर पेटले आहे. मात्र कधी सेनेशी तर कधी भाजपाशी घरोबा करणाऱ्या आरपीआय पक्षाची भूमिका कायम विसंगत राहिली आहे. त्यामुळे कोणाचा जयजयकार करायचा आणि कोणावर नेमकी टीका करायची याबाबत कार्यकर्त्यांमध्येच गोंधळाचे वातावरण आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची  ठोस भूमिका निश्चित करून त्यानुसार राजकीय रणनीती आखणे आवश्यक आहे. त्यात कल्याण डोंबिवली शहरात  मोठ्या प्रमाणावरील गटबाजीमुळे घरघर लागलेला पक्ष आता आठवले यांच्या विधानामुळे अधिकच  भरकटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. 

उल्हासनगरमध्येही रिपब्लिकनचे अगोदर भाजपशी सूत जुळले. त्यानंतर अचानक शिवसेनेशी जवळीक साधणार असल्याचे जाहीर केले. बदलत्या भूमिकेमुळे रिपब्लिकनच्या स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवरील नेत्यांमध्ये ‘सुसंवादाची’ कमी आहे काय, असा सवाल निर्माण झाला होता. मात्र आता आठवले यांनीच हवेचा अंदाज घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट केली जाईल अशी गुगली टाकल्यामुळे निवडणूकांच्या तोंडावर कार्यकर्ते मात्र क्लिन बोल्ड झाले आहेत.

याबाबत आरपीआय मधील विविध पदाधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी उघडपणे बोलण्यास स्पष्ट विरोध केला. मात्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असून आगामी केडीएमसी निवडणुकीत आम्ही कोणाबरोबर असू हे आता सांगता येणार नाही, असे विधान पक्षाचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष किशोर मगरे यांनी केले. 

आरपीआयची अशी राजकीय मोर्चेबांधणी

-केंद्रात आरपीआय भाजपसोबत सत्ता उपभोगत आहे तर उल्हासनगर  महापालिका निवडणुकीत सेनेशी व मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाशी आरपीआयने दिलजमाई केली होती 
-सेना आणि भाजप या दोन्ही पक्षांच्या बॅनरवर आठवले झळकत असल्यामुळे ते सेनेचे की भाजपचे ? असा सवाल उपस्थित होतो 
- ठाणे महापालिका निवडणुकीत एका गटाने  सेनेशी घरोबा केला होता. 
-केडीएमसी निवडणूकीत भाजप आणि रिपाई पक्षातील कार्यकर्त्यांनी  एकत्रितपणे परिवर्तनाचे स्वप्न दाखवत मतांचा  जोगवा मागितला होता.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख