उल्हासनगरात आठवले गटाचा भाजपा-टीम ओमी कलानीला दे-धक्का

उल्हासनगरात आठवले गटाचा भाजपा-टीम ओमी कलानीला दे-धक्का

उल्हासनगर : मतदारांच्या निरुत्साह मुळे 22 टक्यांच्या आत मतदान झालेल्या उल्हासनगरातील प्रभाग 1 (ब) पोट निवडणुकीत महायुती मधील भाजपा-टीम ओमी कलानीच्या उमेदवार वनिता भोईर यांचा रिपाइं आठवले गटाचे उमेदवार मंगल वाघे यांनी 373 मतानी पराभव केला आहे.

मतदारांनी स्थानिक उमेदवार आणि आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन वाघे यांना निवडून आणताना अनपेक्षित पणे दे-धक्का दिला असून हा उल्हासनगरात चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रभाग 1 (ब)मधिल भाजपा नगरसेविका पूजा भोईर यांचे अनुसूचित जमाती हे जात प्रमाणपत्र बोगस ठरल्याने त्यांचे पद समितिने रद्द केले होते.त्यानुसार या प्रभागात पोट निवडणूक जाहिर झाली होती. या प्रभागात भाजपातील टीम ओमी कलानी च्या वनिता भोईर यांना उमेदवारी देण्यात आली. भोईर यांना शिवसेना,साईपक्षाने पाठिंबा दिल्याने त्यांचा महायुतीच्या उमेदवार म्हणून प्रचार केला जात होता. मात्र वनिता भोईर ह्या स्थानिक उमेदवार नव्हत्या.

विशेष म्हणजे केंद्रात आणि राज्यात भाजपा सोबत रामदास आठवले यांचा गट असताना आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी मंगल वाघे या स्थानिक उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. प्रभाग 1 हा शहाड गावठान, सेंच्युरी रेयॉन या परिसरात आहे. वनिता भोईर ह्या कॅम्प नंबर 3 मधिल गावडे शाळेच्या मागे,तर कॉंग्रेसचे नितिन मेश्राम हे कॅम्प नंबर 4 मधिल लालचक्की भागात राहणारे उमेदवार असल्याने मतदारांनी स्थानिक उमेदवार मंगल वाघे यांना पसंती दिली.

मंगल वाघे यांना 2643,वनिता भोईर यांना 2270 व कॉंग्रेसचे नितिन मेश्राम यांना 173 मते मिळाली.81 मते नोटा च्या पारड्यात पडली. निवडणूक निर्णय अधिकारी जगतसिंह गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय वाकोडे यांनी रिपाइं आठवले गटाचे मंगल वाघे यांचा विजय झाल्याचे जाहिर करून त्यांना प्रमाणपत्र दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, पालिका अधिकारी मनीष हिवरे उपस्थित होते.  

यासंदर्भात ओमी कलानी यांच्याशी विचारणा केली असता भाजपा आणि टीम ओमी कलानीची वोट बँक असलेल्या सेंच्युरी व धोबीघाट परिसरातील मतदारानी निरुत्साह दाखवला. आणि त्यांच्या निरुत्साहाचा फटका बसला अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com