ramdas aathawale on bjp symbol | Sarkarnama

आम्ही घेतले कमळ पण तुमच्या पोटात का होते मळमळ?

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

आरपीआयचे 5 उमेदवार कमळ निशाणीवर जरी निवडून आले तरी त्यांना रिपाइंचे आमदार म्हणून वेगळा गट नोंदणी करून विधिमंडळात वेगळे कार्यालय देण्यात येईल.

मुंबई :  राज ठाकरेंनी सत्तेसाठी मते न मागता विरोधी पक्ष होण्यासाठी मते मागितली ते चांगले झाले, मात्र मनसेची स्पर्धा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असल्याने मनसेला राज्यात विरोधी पक्षनेते पदाचा दर्जा सुद्धा मिळणार नाही, असे मत केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी  व्यक्त केले.  

विलेपार्ले येथील आंबेडकर नगरमध्ये ऍड. पराग आळवणी यांच्या जाहीर प्रचार सभेत रामदास आठवले बोलत होते.

आठवले म्हणाले, महायुतीमध्ये रिपाइंला 6 जागा देण्यात येणार होत्या पण 5 जागा आम्हाला दिल्या आहेत. आम्हाला किती जागा दिल्या यापेक्षा महायुतीला विजयी करणे हे रिपाइंसाठी महत्वाचे आहे. रिपाइं स्वतंत्र पक्ष आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कमळ निशाणी आम्ही  घेतली आहे. आम्ही घेतले कमळ पण तुमच्या पोटात का होते मळमळ? माझ्या हाती आहे झेंडा निळा का तुमच्या पोटात उठतो गोळा ? अशी कविता करून विरोधकांना त्यांनी सवाल केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की आरपीआयचे 5 उमेदवार कमळ निशाणीवर जरी निवडून आले तरी त्यांना रिपाइंचे आमदार म्हणून वेगळा गट नोंदणी करून विधिमंडळात वेगळे कार्यालय देण्यात येईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख