Ramdas Aathavle supporters preparing for Ulhasnagar assembly | Sarkarnama

भाजपला पेचात टाकीत उल्हासनगरात आठवले गटाने  बिगुल वाजवला

दिनेश गोगी
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

रामदास आठवले यांनी भाजपाकडे ज्या जागा मागितल्या आहेत, त्यात उल्हासनगर प्रथम क्रमांकावर आहे.

उल्हासनगर : शिवसेना-भाजपा युती होणार की नाही? उल्हासनगरातून भाजपच्या वतीने कुमार आयलानी की ओमी  कलानी  ,पंचम  कलानी   या पैकी कुणाला तिकिट मिळणार? शिवसेना दावा करणार काय? भाजपाने तिकिट नाकारले तर ओमी  कलानी   यांचा पर्यायी पावित्रा कोणता?आदि प्रश्नांवर उल्हासनगरचे वातावरण ढवळून निघाले असतानाच उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्याचा जाहिर बिगुल रामदास आठवले गटाने  वाजवला  आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदास आठवले गटाचे पालिकेतील नगरसेवक तसेच गटनेते भगवान भालेराव यांनी उल्हासनगर विधानसभा निवडणूक लढवण्याचा बिगुल वाजवला आहे. दोन दिवसांपूर्वी शहीद जनरल अरुणकुमार वैद्य (टाऊन हॉल)मध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या लक्षवेधक उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे. उल्हासनगरातून सकारात्मक वातावरण आहे. नुकत्याच प्रभाग 1 मध्ये पार पडलेल्या पोट निवडणुकीत सेना भाजपा साईपक्ष एकत्र असताना आठवले गटाचे मंगल वाघे यांना निवडून आणले आहे.

 विधानसभा क्षेत्रात आठवले गटाचे तीन नगरसेवक असून 2004 साली पप्पू कलानी हे आठवले गटाच्या तिकीटावर निवडून आले होते. या क्षेत्रात पक्षाचे अनेक बालेकिल्ले असून सर्व जाती धर्मातील आसामींचा पक्षात समावेश आहे.या घडिला उल्हासनगरात सिंधी भाषिक केवळ 30 टक्यांच्या आत असून 70 टक्के विविध भाषिक आहेत. जिंकण्याची खात्री असल्याने निवडणूक लढवण्याचा संकल्प केला असून 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भव्य मेळाव्यात पक्षाचे सर्वेसर्वा केंद्रीय मंत्री रामदास  आठवले हे जाहिर घोषणा करतील असे भगवान भालेराव यांनी सांगितले.

उल्हासनगर विधानसभेवर आजमीती पर्यंत केवळ सिंधी भाषिक आमदारांचा वरचश्मा राहिलेला आहे.1962 ते 2014 या कालावधीत 12 आमदार झाले असून त्यात सर्वाधिक विजयाचा चौकार(कॉंग्रेस,दोनदा अपक्ष,आठवले गट) पप्पू  कलानी   यांनी मारला आहे. त्याखालोखाल तिनदा भाजपाचे सितलदास हरचंदानी, दोनदा कॉंग्रेसचे सन्मुख ईसरानी,  एकेकदा परचा (विद्यार्थी)आयलानी- सोशालिस्ट पार्टी, कुमार आयलानी-भाजपा आणि ज्योती कालानी-राष्ट्रवादी यांचा समावेश आहे.2009 मध्ये मनसेचे ऍड. संभाजी पाटिल उभे होते. 2014 मध्ये शिवसेनेचे धनंजय बोडारे यांना 24  हजार मतां पर्यंत पल्ला गाठला होता.

केंद्रात आणि राज्यात आठवले गट हा शिवसेना भाजपा सोबत आहे. मात्र रामदास आठवले यांनी भाजपाकडे ज्या जागा मागितल्या आहेत, त्यात उल्हासनगर प्रथम क्रमांकावर आहे. दरम्यान समाजमाध्यमांवर  कुमार आयलानी,शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, ओमी कलानी, भगवान भालेराव यांचा त्यांचे हितचिंतक भावी आमदार म्हणून प्रचार करत आहेत. सर्व युती होणार की नाही यावर निर्भर आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख