'लाॅकडाऊन' ने झालात बोअर? मग पहा उद्यापासून रामायण आणि महाभारत!

एकेकाळी ज्या दोन मालिकांनी संपूर्ण देशाला खिळवून ठेवले त्या 'रामायण' आणि 'महाभारत' या दोन्ही मेगासिरिअल उद्यापासून दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहेत
Ramayan Mahabharat Again on DD from Tomorrow
Ramayan Mahabharat Again on DD from Tomorrow

पुणे : देशावर कोरोना विषाणूचं संकट कोसळलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रीलपर्यंत संपूर्ण देशात 'लाॅकडाऊन'ची घोषणा केली आहे. या काळात वेळ कसा घालवायचा असा बहुतेकांसमोर प्रश्न आहे. अशा वेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर धावून आले आहेत. एकेकाळी ज्या दोन मालिकांनी संपूर्ण देशाला खिळवून ठेवले त्या 'रामायण' आणि 'महाभारत' या दोन्ही मेगासिरिअल उद्यापासून दूरदर्शनवर दाखवण्यात येणार आहेत. 

रामायण ही मालिका २५ जानेवारी १९८७ रोजी सुरु झाली. ३१ जुलै १९८८ पर्यंत ती सुरु होती. दर रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या मालिकेचे प्रसारण होत असे. लोक मोठ्या श्रद्धेने ही मालिका पहात असत. अनेक घरांमध्ये मालिका सुरु होण्यापूर्वी दूरचित्रवाणी संचाची पूजा केली जात असे. आता उद्यापासून पुन्हा एकदा ही मालिका प्रेक्षकांसमोर येत आहे. कोरोना विषाणूमुळे आलेली परिस्थिती या प्रसारणाला कारणीभूत ठरली आहे. उद्यापासून सकाळी नऊ व रात्री नऊ वाजता रोज प्रत्येकी दोन भागांचे प्रसारण केले जाणार असल्याची घोषणा जावडेकर यांनी केली आहे. या मालिकेत अरुण गोविल यांनी रामाची तर दीपिका चिखलीया यांनी सीतेची भूमीका केली होती. प्रसिद्ध अभिनेते व कुस्तीगीर दारासिंह यांनी हनुमानाची भूमीका केली होती. अरविंद त्रिवेदी यांनी रावणाची भूमीका केली होती. 

महाभारत ही मालिकाही अशीच लोकप्रिय ठरली. प्रसिद्ध निर्माते बी. आर. चोप्रा यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. त्यांचे पूत्र रवी चोप्रा मालिकेचे दिग्दर्शक होते. ही मालिका जगातील सर्वाधिक पाहिलेली मालिका ठरली. दूरदर्शनवरुन १९८८ ते १९९० या काळात ही मालिका प्रसारित केली गेली. ९४ भागांमध्ये ही मालिका दाखवली गेली. त्यावेळी २३ वर्षांचे असलेल्या नितिश भारद्वाज यांनी श्रीकृष्णाची भूमीका केली होती. बंगाली अभिनेत्री रुपा गांगुलीने द्रोपदीची भूमीका केली होती. प्रसिद्द वृत्तनिवेदन हरीष भिमाणी यांच्या आवाजातले 'मै समय हू....' हा सुरुवातीचा टायटल डायलाॅग खूपच गाजला होता. गुफी पेंटल यांनी केलेली शकुनीमामाची भूमीका सुद्धा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. 

आता या दोन्ही मालिका लाॅकडाऊनमध्ये काय याचे उत्तर घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहेत. महाभारत ही मालिका उद्या (शनिवार ता. २८) पासून दूरदर्शन भारती (DD Bharati) या चॅनेलवर दुपारी १२ व सायंकाळी सात असे रोज दोन भाग दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसाच्या २४ तासांपैकी किमान चार तास करायचे काय हा प्रश्न मिटणार आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com