...म्हणून राम शिंदेंनी गोपीनाथगडाचा कार्यक्रम टाळला?

राम शिंदे यांना विधान परिषदेच्या आमदारकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे ते सावधपणे पावले टाकत आहेत.
ram shinde skip gopinathgad programme
ram shinde skip gopinathgad programme

पुणे: दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज परळी (जि. बीड) येथील गोपीनाथगडावर झालेल्या पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यात माजी मंत्री राम शिंदे यांची अनुपस्थिती चर्चेची ठरली आहे. 

राम शिंदे यांनी फडणवीस मंत्रीमंडळात जलसंधारण, पणन मंत्री म्हणून काम केले आहे. भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना प्रोजेक्ट केले होते, मात्र यंदा त्यांना विधानसभेत जाण्याची हॅटट्रिक साधता आली नाही. नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांचा दारूण पराभव झाला. मात्र गेले आठ दहा दिवस सुरू असलेल्या पंकजा मुंडे नाराजी प्रकरणात ते पक्षाच्या बाजूने सक्रिय होते. मात्र आजच्या गोपीनाथगडावरील मेळाव्याला ते उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीचे आता अनेक अर्थ काढले जात आहेत.

गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदेंना लिफ्ट दिली. त्यांना कर्जत जामखेडमधून पहिल्यांदा आमदार करण्यात मोठा वाटा उचलला. त्यामुळे राम शिंदे हे गोपीनाथ मुंडे यांचे नेतृत्व मानत होते, मात्र मुंडेंच्या निधनानंतर त्यांनी कालानुरूप आपल्या भुमिकेत बदल केला. पंकजा मुंडे यांच्याशी चांगले संबंध जपत देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व स्विकारले. ज्या ज्या वेळी पंकजा आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष झाला, त्यावेळी राम शिंदे हे फडणवीस यांच्या बाजूने राहिले. यावरून वाद व्हायला लागल्यावर ते पंकजांना भेटून त्यांचे नेतृत्व मान्य करायचे. 

तीन वर्षापुर्वी पंकजा परदेशात असताना फडणवीस यांनी पंकजा यांच्याकडे असलेले जलसंधारण खाते काढून घेतले आणि ते राम शिंदे यांना दिले. त्यावरून मुंडे समर्थकांत क्षोभ उसळल्यावर राम शिंदेंनी सबुरीने घेतले. पंकजा मुंबईत येणार नाहीत तोपर्यत कार्यभार घेणार नाही, अशी भुमिका घेतली. मात्र फडणवीसांनी कडक भुमिका घेतल्यावर कार्यभार घेतला. त्यानंतर फडणवीसांनी ओबीसी खाते तयार करून ते राम शिंदे यांच्याकडे दिले. राज्यभर ओबीसी नेते म्हणून पंकजा यांची प्रतिमा असताना फडणवीसांनी राम शिंदे यांना ताकद दिली. भगवानगडाच्या वादात राम शिंदे हे फडणवीसांबरोबर होते. त्याचा राग मुंडे समर्थकांत होता. तीन वर्षापुर्वी सावरगावात झालेल्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात राम शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजीही झाली होती.  

ताज्या घटनाक्रमात, पंकजा यांनी गोपीनाथगडावरील मेळाव्यासाठी 1 डिसेंबरला फेसबुक पोस्ट लिहली. त्यानंतर पंकजा भाजप सोडतील, अशी चर्चा सुरू झाली. यापार्श्वभुमीवर पंकजा यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते पंकजा यांना भेटले. त्यात राम शिंदेही होते. त्यांनी पंकजा नाराज नाहीत आणि त्या भाजप सोडणार नाहीत, असा दावा केला होता. यापार्श्वभुमीवर राम शिंदे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोपीनाथगडावर येतील, अशी मुंडे समर्थकांना अपेक्षा होती. मात्र ते आले नाहीत. परिणामी फडणवीस नाराज होवू नयेत, म्हणून राम शिंदेंनी कार्यक्रम टाळल्याची चर्चा सुरू झाली.

एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून थेटपणे देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्यासह अन्य नाराज नेते गोपीनाथगडावर येणार असल्याने तिथे पक्षविरोधी भाषणे होणार, हे गृहित धरून राम शिंदे कार्यक्रमापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भाने आमच्या नगर प्रतिनिधीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होवू शकला नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com