कोरोनामुळे पेशवेकालीन श्रीराम रथोत्सवाची २४८ वर्षांची परंपरा खंडीत

कोरोनाचा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्याने शहर, समाजाच्या दैनंदीन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. तसेच अनेक प्रथांवर झाला आहे. नाशिकची सांस्कृतिक, धार्मिक ओळख असलेल्या श्रीरामासह गरुड रथोत्सव यंदा 'कोरोना'मुळे रद्द करावा लागला
Ram Rathyatra Tradition in Nashik Breaked after Two Forty Years
Ram Rathyatra Tradition in Nashik Breaked after Two Forty Years

नाशिक : 'कोरोना'चा संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू केली आहे. त्याने शहर, समाजाच्या दैनंदीन व्यवहारांवर मोठा परिणाम झाला. तसेच अनेक प्रथांवर झाला आहे. नाशिकची सांस्कृतिक, धार्मिक ओळख असलेल्या श्रीरामासह गरुड रथोत्सव यंदा 'कोरोना'मुळे रद्द करावा लागला. शहराच्या इतिहासात तब्बल २४८ वर्षांची ही परंपरा यंदा खंडित झाली आहे.

श्रीरामरथ यात्रा म्हणजे सबंध शहर, राजकीय, सामाजिक नेते अन्‌ श्रीरामभक्तांसाठी आनंदोत्सव असतो. शहरातील प्रथम नागरीक, महापौरांपासून तर खासदार, आमदार, नगरसेवक अन्‌ सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून त्यात सहभाग व स्वागतासाठी चढाओढ असते. यंदा "कोरोना'मुळे गेले काही दिवस मंदीर बंद आहे. यंदाचा श्रीरामजन्मोत्सव देखील मोजक्‍या पुरोहितांच्या उपस्थितांतच झाला. श्रीराम, गरुड रथयात्रा तर रद्द करण्यात आली आहे.

शहरातील सर्वांत मोठा रथोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथोत्सवाला १७७२ मध्ये सुरवात झाली. रथोत्सवाची ही परंपरा यंदा २४८ व्या वर्षी प्रथमच खंडित झाली. यापूर्वी १९३२ ला रथोत्सव काही कारणास्तव होऊ शकला नाही. मात्र, रामकुंडावर होणारे श्रीराम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तींना अवभृत स्नान आणि पूजा करण्यात आली होती. यंदा मात्र कोरोनाचा प्रकोप वाढल्याने श्रीराम व गरुडरथाची परंपरा खंडित झाली आहे. शनिवारी सायंकाळी मंदिराच्या आवारातच प्रभू श्रीराम-लक्ष्मण यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. रात्री मंदिरातील विहिरीत मूर्तींना अवभृत स्नान घालून विधिवत पूजा करून पुन्हा त्या स्थानापन्न करण्यात आल्या. 

रामनवमीनंतर कामदा एकादशीला श्रीराम व गरुडरथ काढण्याची पेशवेकालीन परंपरा आहे. शहरातील ग्रामोत्सव म्हणून हा रथोत्सव ओळखला जातो. दर वर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्रोत्सव होतो. वर्षभर पुरिया मार्गालगतच्या शेडखाली असलेला श्रीरामरथ दशमीला रंगरंगोटी व रोषणाई करून काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजाजवळ आणला जातो. त्यानंतर कामदा एकादशीला रथोत्सव काढला जातो.

पुढे गरुडरथ त्यामागून श्रीरामरथ असा क्रम असतो. दोन्ही रथ नाड्यांच्या सहाय्याने ओढण्याची परंपरा आहे. नाग चौक, काट्या मारुती, गणेशवाडी, गौरी पटांगणावरून म्हसोबा पटांगण येथे आल्यानंतर रामरथ थांबविला जातो. गरुडरथ रोकडोबा मैदान, दिल्ली दरवाजा, मेन रोडकडून मिरवून गंगाघाटाच्या रस्त्याने येतो, त्यापाठोपाठ रामरथ रामकुंडावर आणून तेथे मूर्तींना अवभृत स्नान घालून पूजा केली जाते. रथांच्या मार्गात ठिकठिकाणी सुवासिनी औक्षण करतात. पूजेनंतर पहाटे दोन्ही रथ पुन्हा काळाराम मंदिराकडे नेण्यात येतात.

पेशवेकालीन परंपरा

सवाई माधवराव पेशवे एकदा आजारी पडल्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी श्रीमंत गोपिकाबाई पेशवे यांनी प्रभू श्रीरामाला नवस केला होता. सवाई माधवराव पेशवे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर पेशवे यांनी श्रीरामाला रामरथ अर्पण केल्याचे सांगितले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com