अत्यंत निर्भीड आणि मूलभत हक्कांसाठी प्राणपणाने लढणारा कायदेतज्ज्ञ...

अत्यंत निर्भीड आणि मूलभत हक्कांसाठी प्राणपणाने लढणारा कायदेतज्ज्ञ...

ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्याशी माझा संबंध आला तो मी पुण्यातील ज्येष्ठ विधिज्ञ बाबाराव भिडे यांच्याकडे उमेदवारी करत असताना. बाबारावांचे आणि त्यांचे अत्यंत घट्ट असे स्नेहाचे संबंध होते आणि दोघांमधला समन्वय खूप चांगला होता. एका खटल्यात त्यांनी बाबारावांना सांगितले की तुम्ही या प्रकरणात उलटतपासणी घ्या मी युक्तीवाद करेन, त्यांनी तसे केलेही. कुठल्याही केसचा प्रचंड अभ्यास आणि त्याचे संदर्भ काढण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेत असत. एखादे प्रकरण एकदा त्यांना पटले आणि त्यांना त्याबद्दल खात्री वाटली की ते काम ते स्वीकारत, मग कुणी कितीही त्यांना त्याबद्दल कितीही विरोध केला किंवा आक्षेप घेतले तरी त्यापासून ते बाजूला होत नसत. 

जेठमलानी हे कायद्याच्या आणि विविध खटल्याचे संदर्भ देण्यात इतके अचूक आणि अपडेट असता. एकदा एका खटल्यात आरोपीच्या जामीनासाठी युक्तीवाद करत असताना त्यांनी काही मुद्दे मांडले. सरकारी वकिलांनी त्यांचे मुद्दे खोडून काढताना सर्वोच्च न्यायलयाचा नुकत्याच लागलेल्या एका खटल्याचा संदर्भ देऊन जामीन देणे कसे चुकीचे आहे अशी बाजु जोरदारपणे मांडली. जेठमलानी यांनी तत्काळ सवोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या पूर्णपीठाने दिलेल्या एका निवाड्याचा उल्लेख करून सरकारी वकिलांनी मांडलेला मुद्दा कसा चुकीचा आहे व पोलिसांनी जरी त्या प्रकरणात गंभीर कलमे लावलेली असली तरी इथे जामीन देणे कसे योग्य आहे ते पटवून दिले. त्यांनी सरकारी वकिलांनी जो संदर्भ दिला होता त्यातल्या काही विसंगती त्यांनी दाखवून दिल्या, त्या न्यायाधीशांनी इंटरियम बेलचा अर्ज मंजूर केला आणि प्रकरण मोठ्या न्यायालयाकडे वर्ग केले. 

मूलभूत हक्काच्या रक्षणासाठी ते प्रणापणाने व अटीतटीने लढत असत. जेठमलानी हे खूप मोठी फी आकारणारे म्हणून देशात प्रसिद्ध होते. मात्र त्याचवेळी त्यांनी मूलभूत हक्काच्या लढ्यासाठी आणि तत्वासाठी शेकडो केसेस एकही पैसा मानधन न घेता लढवल्या आहेत याचा मी साक्षीदार आहे. देशात जेव्हा आणिबाणी पुकारली गेली त्यावेळी ते काही काळाने पुण्यात आले होते. त्यांनी पुण्याच्या कोर्ट सभागृहात आणिबाणीविरोधात इतके मुद्देसूद आणि जहाल असे भाषण केले होते. आजही अनेक वकीलांच्या ते भाषण लक्षात आहे. खरेतर त्यांना या भाषणाबद्दल अटक होऊ शकली असती पण ते मुळीच घाबरले नाहीत, त्यांनी त्यांचे म्हणणे अत्यंत ठामपणाने मांडले. आणिबाणीमुळे मूलभूत अधिकारांचा कसा संकोच होतोय आणि हे नागरिकांच्या आणि देशाच्या दृष्टीने किती घातक आहे हे त्यांनी विविध उदाहरणे देऊन पटवून दिले होते. 

त्यांच्या मोठपणाचे आणि मनस्वीपणाचे किस्से खूप आहेत. एकदा बार कौन्सिल ऑफ इंडियावर प्रतिनिधी निवडताना डी. आर धनुआ यांची निवड करताना त्यांनी त्यांना सपोर्ट केला होता. खरेतर आधीच्या निवडणुकीत धनुआ यांनी जेठमलानी यांना विरोध केला होता. पण ती बाब लक्षात न ठेवता कौन्सिलवर तू तिथे जायला हवास, तुझा तो अधिकार आहे असे सांगून त्यांनी धनुआ यांना पाठिंबा दिला होता. एका केसमध्ये काही संदभ शोधायचे होते, मी त्यांच्याबरोबर काम करत होते दुपारी सुरू झालेले काम रात्री 3 पर्यंत चालले होते त्यांनी त्या केससंदर्भातले महत्वाचे सगळे जटील असे संदर्भ शोधून काढले, त्यांना एखादी गोष्ट पटली की मग ते त्यामागे लागत असत. निर्भिडता हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव होता. फीअरलेस असे आयुष्य ते जगले. आपल्या निर्णयाने कुणाला वाईट वाटेल, कोण काय म्हणेल याची ते पर्वा करत नसत.

कायद्याच्या क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा याचे नेमके भान त्यांना होते. कुठल्या प्रश्‍नाला किती वेळ द्यायचा याचे गणित त्यांनी बसवले होते त्यामुळे त्यांनी दोन्ही क्षेत्राला पूरेपूर न्याय दिला. कायदामंत्री असताना त्यांनी लक्षणीय काम केले. जेठमलानी यांचे कायदा क्षेत्राच्या दृष्टीने त्यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे बंगळुरू येथील " नॅशनल लॉ स्कूल' ची उभारणी आणि कायद्याचा पाच वर्षाचा प्रोफेशनल अभ्यासक्रम तयार करण्यात त्यांचा सिंहाच वाटा आहे. हे स्कूल उभे करताना त्यांनी देशातील पाच मुख्यमंत्र्यांची मदत घेतली आणि हे स्कूल उभे केले. एका मुख्यमंत्र्यांकडून या स्कूलसाठी त्यांनी जागा मिळवली आणि अन्य चौघांकडून या स्कूलसाठी भरघोस अशा देणग्या मिळवल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com