धुळे :  द. वा. पाटील यांची तिसरी पिढी धुळे ग्रामीणच्या लढाईस सज्ज

Dhule-Rural-Bhadane
Dhule-Rural-Bhadane

धुळे : धुळे जिल्ह्याच्या राजकीय पटलावर वादळी व्यक्तिमत्त्वातून चार दशके दबदबा राखणारे माजी आमदार (कै.) द. वा. पाटील यांची तिसरी पिढी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राम भदाणे यांच्या रूपाने धुळे ग्रामीण मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज आहे. आजोबांच्या कार्यकर्तृत्वाचा वसा नेटाने पुढे नेत राम भदाणे यांनी वेगळी छाप जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण केली आहे.

माजी आमदार (कै.) दत्तात्रय वामन भदाणे यांनी 1990, 1995, 2004 मध्ये शिंदखेडा मतदारसंघातून विजय मिळविला होता. ते "अण्णासाहेब' म्हणून सर्वपरिचित होते. कुशल राजकारणी, नेतृत्व म्हणून जनमानसावर त्यांनी ठसा उमटविला होता. त्यांचा वारसा समृद्धपणे ज्येष्ठ सुपुत्र व धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, स्नुषा ज्ञानज्योती भदाणे आणि नातू राम भदाणे यांनी पुढे सुरू ठेवला आहे.

 मनोहर भदाणे हे 1984 ते 1992 पर्यंत नगावचे सरपंच, पुढील पाच वर्षे जिल्हा परिषदेचे बांधकाम व शिक्षण सभापती, 1999 मध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, धुळे- नंदुरबार जिल्हा बॅंकेचे संचालक, बाजार समितीचे संचालक, जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि विविध राजकीय पदांची जबाबदारी समर्थपणे पेलून त्यांनी वेगळी छाप निर्माण केली. 

यापाठोपाठ मनोहर भदाणे यांच्या पत्नी ज्ञानज्योती यांनीही राजकीय यशस्वितेचा आलेख सतत उंचावत ठेवला. जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सभापती, नगावच्या विद्यमान सरपंच, अशा पदांवर त्या आरूढही झाल्या. नगाव एज्युकेशन ट्रस्ट व गंगामाई एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून भदाणे परिवाराने असंख्य विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले.


आजोबा, आई- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राम मनोहर भदाणे यांनीही परिवाराच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावत ठेवणे, विजयाची पताका पुढेही फडकावण्याचा संकल्प केला आहे. त्यांनी अल्पावधीत धुळे ग्रामीण मतदारसंघात चांगला दबदबा निर्माण केला आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 50 हून अधिक सभांमध्ये हजेरी लावून, भाजपची ध्येयधोरणे मतदारांपर्यंत पोहोचवून त्यांनी वरिष्ठ नेत्यांचेही लक्ष वेधले होते. या निवडणुकीत भाजपला, उमेदवार माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना विजय मिळाला होता. विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम लोकसभा निवडणुकीत केल्यानंतर युवा नेते राम भदाणे निवडणुकीतून विधानसभेची पायरी चढण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

त्यांनी संवाद दौरा उपक्रमातून गावोगावी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी विरोधकांना हादरा देत पक्ष प्रवेशाचे सत्र सुरू केले आहे. भदाणे परिवाराने सत्तेच्या माध्यमातून तरुणांसह शेतकरी, महिला व तळागाळातील विविध घटकांच्या विकासासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य व रोजगार शिबिराचे उपक्रम राबवून, मूलभूत सोयीसुविधा व विकासाचे विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्यासह विकासाच्या विविध क्षेत्रात त्यांनी कार्यकर्तृत्वातून घट्ट पाय रोवले आहेत. माजी आमदार द. वा. पाटील यांची तिसरी पिढी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com