SARKARNAMA EXCLUSIVE - 'या' अभिनेत्याला राकेश मारियांनी लगावली होती कानफटात! - Rakesh Maria Slapped Sanjay Dutt During Investigation | Politics Marathi News - Sarkarnama

SARKARNAMA EXCLUSIVE - 'या' अभिनेत्याला राकेश मारियांनी लगावली होती कानफटात!

अमित गोळवलकर
शनिवार, 29 फेब्रुवारी 2020

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी आपल्या आत्मचरित्रात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. मुंबई बाँबस्फोटांचा तपास मारिया करत होते. त्यावेळी संजय दत्त कडे एके -४७ रायफल बाळगल्याबद्दलच्या गुन्ह्याचा तपास करतानाचा किस्सा मारियांनी या आत्मचरित्रात लिहिला आहे

पुणे : सिनेमातले ढिश्युम ढिश्युम वेगळे. तिथे एकतर 'डमी' असतात किंवा मारामारीची 'ट्रीक' असते. हिरोने व्हिलनला बाॅक्स मारला असं पडद्यावर दिसतं. पण प्रत्यक्षात तो हात व्हिलनच्या नाकाच्या खूप दूरून गेलेला असतो. पण पोलिस खात्यातल्या एका 'हिरो'ने त्यावेळच्या एका 'खलनायका'च्या खरोखरच कानफटात मारली होती. खुद्द मारियांनी आपल्या LET ME SAY IT Now या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारिया हे त्यावेळच्या 'हिरो'चे नाव. त्या वेळचा 'खलनायक' अर्थातच होता पडद्यावरचा 'हिरो' अर्थात चित्रपट अभिनेता संजय दत्त. मुंबई बाँब स्फोट प्रकरणाचा तपास सुरु होता. मारिया त्यावेळी पोलिस उपायुक्त होते. मुंंबई बाँबस्फोटाचा तपास त्यांच्याकडे होता. त्यावेळी मारिया यांच्यासमोर अचानक नाव आलं ते संजय दत्तचे. त्याचे पिता अभिनेते स्व. सुनील दत्त त्यावेळी काँग्रेसचे खासदार होते. मुंबईतल्या दंगली होऊन गेल्या होत्या. सुनील दत्त यांच्यावर अल्पसंख्याकांना मदत केल्याचे आरोप होत होते.

हे देखिल वाचा - होय कसाबचं नाव समीर चौधरीच होतं - मारिया म्हणाले ते खरंच!

मुंबई बाँबस्फोटातले बहुसंख्य आरोपी त्यावेळी तपास करणारे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांच्यासमोर नाव आले संजय दत्तचे. संजय दत्तच्या (खरेतर सुनील दत्त यांच्या) घरात एके-४७ रायफली ठेवल्या गेल्या होत्या, असे एका संशयिताने मारिया यांना सांगताच मारिया यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. त्यावेळचे पोलिस आयुक्त अमरजितसंग सामरा आणि सह पोलिस आयुक्त महेश नारायण सिंग यांनी ही परिस्थिती कोशल्याने हाताळली.

त्यानंतर माॅरिशसहून मुंबईत आलेल्या संजय दत्तला विमानतळावरच अटक करुन क्राईम ब्रँचच्या कोठडीत आणण्यात आले. याबाबत मारिया आपल्या पुस्तकात सांगतात....

....तू खरं सांगणार आहेस की तू काय केलं आहेस हे मी तुला सांगायला हवं असं मी संजय दत्तला सांगितलं. संजय दत्त माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला होता. सर मी काहीच केलेलं नाही असं संजय दत्तनं मला सांगितलं. गेल्या काही दिवसांपासूनचा प्रचंड ताण माझ्या मनावर होता. त्यामुळं मी संजय दत्तचं खोटं बोलणं सहन करु शकलो नाही आणि त्याच रागाच्या भरात उठून मी एक सणसणीत कानफटात लगावली. त्या फटक्यानं संजय दत्त खुर्चीवरुन कोलमडला. त्याचे पाय हवेत गेले. मी त्याचे लांब आणि सोनेरी झाक असलेले केस घट्ट पकडले. संजय दत्त प्रचंड घाबरलेला होता. त्याच्यावर ओणवा होत त्याच्या डोळ्यांत पाहून मी गरजलो, मी सभ्य माणसाप्रमाणं तुला प्रश्न विचारतो आहे. तुही सभ्य माणसाप्रमाणं उत्तरं दे.....

....आणि त्यानंतर मात्र संजय दत्तने मारियांना सगळं काही सांगून टाकलं. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख