शिवसेना खासदार जाधव राष्ट्रवादी बुडवायला का निघालेत?

राष्ट्रवादीचा पालकमंत्री आणि त्यांचा शिवसेनेला रोखण्यासाठी सुरू असलेला खेळ यामुळेच जाधव अधिक आक्रमक झाल्याचे बोलले जाते.
शिवसेना खासदार जाधव राष्ट्रवादी बुडवायला का निघालेत?
Shivsena Mp Sanjay jadhav- Ncp Clash News Parbhani

औरंगाबाद ः परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी काल मतदारंसघातील घनसांवगी येथे बोलतांना राष्ट्रवादी काॅंग्रेसला आम्ही कधीही बूडवू असा दम भरला. (Why did Shiv Sena MP Jadhav angrey with NCP?)तसं जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असं शीतयुध्द नेहमीचं होत असतं. पण यावेळी जाधव यांनी जरा जास्तच आक्रमक भूमिका घेतली.

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची परभणीला बदली करू नका, अशी शिफारस आपण केली होती याची कबुलीही जाधव यांनी शिवसेनेच्या मेळाव्यात बोलतांना दिली. गोयल जिल्हाधिकारी नको, अशी भूमिका घेऊन मुंबईत ठाण मांडून बसलेल्या जाधव यांच्या प्रयत्नांना यशही आले, मुख्यमंत्र्यांनी गोयल यांना परत मुंबईत बोलावून घेतले होते. (Shivsena Mp Sanjay Jadhav, Parbhani) पण राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक व राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.

खुद्द मुख्यमंत्र्यांनी गोयल यांची बदली रद्द केल्यामुळे हा विषय आता महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी नेल्याशिवाय मार्गी लागणार नाही, हे या दोघांनीही ओळखले. फौजिया खान यांनी दिल्लीत लोकसभेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे तिथेच शरद पवारांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. (Ncp Maharashtra) पवारांनी देखील तो गांभीर्याने घेत अजित पवारांना त्यात लक्ष घालायाला सांगितले आणि आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात बोलू असे सांगतिले. ते मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि गोयल यांची पुन्हा परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली.

खासदार संजय जाधव यांना हेच पचनी पडले नाही. परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एकही आमदार, खासदार जनतेतून निवडून आला नाही, तरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री आणि त्यांचा शिवसेनेला रोखण्यासाठी सुरू असलेला खेळ यामुळेच जाधव अधिक आक्रमक झाल्याचे बोलले जाते. जिल्हाधिकाऱ्यांची बदली करू नका, अशी शिफारस आपणच केल्याची कबुली दिल्यानंतर राष्ट्रवादीच्या दबावामुळेच मुख्यमंत्र्यांना आणि आपल्यालाही माघार घ्यावी लागली, याचे दुःखही जाधव यांनी घनसांवगीच्या मेळाव्यातून व्यक्त केले.

माघार जिव्हारी लागली..

मुख्यमंत्र्यांचा आदेश शिरसांवद्य म्हणत त्यांनी आपल्या वेदनांवर फुंकर घातली खरी, पण राष्ट्रवादीचे वाढते वर्चस्व आणि महाविकास आघाडीमुळे ते सहन करावे लागत असल्याची चीड जाधव यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसचा वाद गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे.  दर पाच वर्षाला येथील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या समोर राष्ट्रवादी कॉग्रेसचा उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून असतो. २०१९ मध्येही राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी लोकसभा निवडणुकूीच्या काही दिवस आगोदर एका जाहिरातीच्या माध्यमातून खासदार संजय जाधव यांच्यावर निशाना साधला होता.

'खासदार बदला जिल्हा बदलेल' असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आले होते. राष्ट्रवादीकडून शिवसेनेला डिवचण्याचे अनेक प्रकार जिल्ह्यात झाल्याचे पहायला मिळाले. काही दिवसापूर्वी परभणी जिल्हा नियोजन समिती सदस्यांच्या निवडीवरून देखील शिवसेना व राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये संघर्ष झाला होता.  त्यानंतर या नियुक्त्या रखडल्या होत्या. गंगाखेड विधानसभा मतदार संघातही राष्ट्रवादी कॉग्रेसचे डॉ. मधुसुदन केंद्रे यांच्या विरोधात शिवसेनेने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना प्रथमच २०१९ मध्ये गंगाखेड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुक मैदानात उतरली होती. कारण यापूर्वी ही जागा युतीमध्ये भाजपच्या वाट्याला जात होती. अशी अनेक कारणे शिवसेना-राष्ट्रवादीच्या वादामागे आहेत.

शिवसेनेची सत्ता असलेल्या जिल्ह्यातील मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर प्रशासक नेमण्यात आले तेव्हा देखील शिवसेनेला डावलून राष्ट्रवादीने आपले प्रशासक नेमत शिवसेनेला दाबण्याचा प्रयत्न केला होता. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद राष्ट्रवादीपेक्षा अधिक असतांना सुद्धा महाविकास आघाडीमुळे होणारा अन्याय निपूटपणे सहन करावा लागत असल्याच्या भावना शिवसैनिकांमध्ये होत्या. खासदार संजय जाधव यांनी याबद्दल यापुर्वीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता.

राजीनामास्त्रही कामाला आले नाही..

एवढेच नाही तर त्यांनी ठाकरे यांच्याकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा देत जिल्ह्यात राष्ट्रवादी व पालकमंत्र्यांकडून शिवसेनेवर कसा अन्याय केला जातो, याचा पाढाच त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात वाचला होता. लोकांची कामे करता येत नसेल तर खासदार पदावर राहण्याचा काय उपयोग, असा संतापही त्यांनी तेव्हा व्यक्त केला होता. तेव्हा देखील उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची समजुत काढून त्यांचा राजीनामा नाकारला होता. कृषी उत्पन्न् बाजार समिती प्रशासक नेमणूकी संदर्भात उद्धव ठाकरे यांनी थेट अजित पवार यांच्यांशी बोलून हा वाद तेव्हा मिटवला होता. 

परभणी जिल्ह्यात शिवसेनेचा कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्याच मांडीला मांडी लावून बसावे लागत असल्याने, त्यांचे वर्चस्व सहन करावे लागत असल्याने जाधव  बेचैन आहेत. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांभाळायचे तर जिल्ह्यातील सुत्र आपल्या हाती असली पाहिजे, पण नेमकं ती राष्ट्रवादीच्या हाती जात आहेत. यातून शिवसेना आणि वैयक्तिक संजय जाधव यांच्या वर्चस्वालाच धक्का बसतो की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याचाच परिणाम म्हणून जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत थेट राष्ट्रवादीला बुडवण्याची धमकी देण्यात झाला. अर्थात या धमकीचे पडसाद राष्ट्रवादीकडून देखील येणाऱ्या काही काळात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे मात्र नक्की. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवण्याची भाषा देखील जाधव यांनी केली, त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष अधिक बळावणार हे मात्र नक्की. आता यावर राज्यातील दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare


 

Related Stories

No stories found.