बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत पंकजा मुंडेंचा सूचक इशारा.. - Visiting Balasaheb's memorial, Pankaja Munde's warning | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत पंकजा मुंडेंचा सूचक इशारा..

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

राज्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करेन, पण वैयक्तिक टिका कधीही करणार नाही, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले होते. त्यांनतर आज बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर पोहचत पंकजा यांनी आपले शिवसेना प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले असून आता पुन्हा  एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

औरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव, माजी  मंत्री पकंजा मुंडे यांनी आज शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त शिवतीर्थावर जाऊन त्यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. बाळासाहेबांना अभिवादन करत असतांनाचे फोटो देखील त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून व्हायरल केले आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घ्यायला भाजपचे नेते येणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपचे इतर नेते शिवतीर्थाकडे फिरकले नाही, पण पंकजा मुंडे यांनी मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत सूचक इशारा दिला आहे.

प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्या समोर मी पक्षावर अजिबात नाराज नाही, भाजप हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असे ठणकावून सांगणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला सूचक इशारा दिला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला भावासारखे आहेत, त्यांच आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत, असे वेळोवेळी सांगत त्यांच्यावर टिका करण्याचे टाळणाऱ्या पंकजा मुंडे आज चक्क शिवतीर्थावर पोहचल्या.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी राज्यातून हजारो शिवसैनिक व नागरिक त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर येत असतात. राज्यात शिवसेना-भाजपची सत्ता होती तेव्हा झाडून भाजपच्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर हजेरी लावली होती. पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने राष्ट्रवादी-काॅंग्रेस् सोबत जाऊन सत्ता स्थापन केली, आणि भाजपचे संबंध बिघडले. त्यामुळे सत्तेत एकत्र असतांना बाळासाहेबांची आठवण काढणारे, भाजपचे नेते आज शिवतीर्थावर येतील का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

राज्यातील भाजपचा एकही बडा नेता बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर आला नसला तरी पंकजा मुंडे यांनी मात्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेत त्यांना अभिवादन केले. पंकजा यांच्या या कृतीतून त्यांनी स्वःपक्षातील नेत्यांना सूचक इशारा दिल्याचे बोलले जाते.  परळी विधानसभा निवडणुकीतील पराभव, त्यानंतर विधान परिषदेवर नाकारण्यात आलेली संधी, आपल्याच कार्यकर्त्यांना राज्यसभा आणि विधान परिषदेव घेत जखमेवर मीठ चोळण्याचा झालेला प्रयत्न यामुळे पंकजा मुंडे यांचे पंख छाटले जात असल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून देखील पंकजा यांचे पक्षाच्या नेत्याशी खटके उडाल्याची चर्चा होती. रमेश पोकळे यांच्या उमेदवारीसाठी पंकजा यांनी जोर लावला असतांना पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देत पुन्हा एकदा पंकजा यांना दुर्लक्षित केल्याचे दिसून आले. यावर थेट काही न बोलता पंकजा यांनी बंडखोरी केलेल्या पोकळे यांना बळ दिल्याची चर्चा आहे.  पोकळे यांनी उमेदवारी कायम ठेवणे याला पंकजा यांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय ते शक्य नाही असेही बोलले जाते. त्यामुळे मी नाराज नाही असे सांगणाऱ्या पकंजा कृतीतून मात्र आपली नाराजी उघड करतच आहेत.

शिवसेनेच्या आॅफरला प्रतिसाद ?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंकजा मुंडे देखील पक्ष सोडणार अशा चर्चांना उधाण आले होते. शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी तर पंकजा यांना शिवेसनेत येण्याची आॅफरही दिली होती. यावर पंकजा यांनी तुमच्या आॅफरचे मी स्वागत करते असे म्हणत, राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असतांना उद्धव ठाकरे यांच्यावर टिका न करण्याची भूमिका पंकजा यांनी घेतली आहे. राज्याचे प्रमुख आणि मुख्यमंत्री म्हणून मी उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करेन, पण वैयक्तिक टिका कधीही करणार नाही, असेही पंकजा यांनी स्पष्ट केले होते. त्यांनतर आज बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवतीर्थावर पोहचत पंकजा यांनी आपले शिवसेना प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले असून आता पुन्हा  एकदा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

Edited By : Jagdish Pansare

 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख