कोरोनाकाळात प्रशासन, आरोग्य यंत्रणांच्या मदतीला `वैजापूर पॅटर्न` धावून आला

पोलिसांची जागा ८० स्वयंसेवकांनी घेतली आणि आठ गस्ती चौक्यांवर त्यांनी पोलिसांचे कर्तव्य बजावले. एका सरकारी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ताबा खासगी डॉक्टरांनी घेतला आणि बाह्यरुग्ण तपासणी सत्र चालवले.
corona vaijapur patern news
corona vaijapur patern news

औरंगाबादः कोरोनाविरुद्धच्या या युद्धामध्ये विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, नर्स यांच्यासोबत पोलिसही अहोरात्र झटत आहेत. या पोलिसांना ठरावीक काळानंतर विश्रांती मिळणेही गरजेचे आहे. या विश्रांतीसाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे एक अभिनव प्रयोग राबविण्यात आला. तेथील जनतेने आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन स्वयंसेवकांची फौज उभी केली. ही पर्यायी यंत्रणा पोलिसांना आणि प्रशासनाला मदत करण्याठी पुढे आली आणि व्यवस्थेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी झाला.

कोरोनाच्या या संकटात सर्वात जास्त कसोटी लागली आहे ती पोलिस यंत्रणेची. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी, केंद्र सरकारकडे अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. पण, याच पोलिसांना मदत करणारा स्वयंसेवकांचा अनोखा प्रयोग वैजापूर येथे राबविला गेला.

९ आणि १० मे रोजी स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक संस्था यांनी एकत्र येत प्रशासनातील कर्मचा-यांना आठवड्याच्या शेवटी विश्रांती घेता यावी यासाठी, त्यांची कामे करण्याची इच्छा दर्शवली. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळाला आणि असे हे सर्वसमावेशक सहभागीदारीचे प्रारूप स्थानिक लोकांनीच तयार केले. आमदार रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनाची या प्रयोगाला साथ लाभली. नियोजन करताना जिल्हा प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी, राजकीय कार्यकर्ते, नगरपालिका आणि पंचायत सदस्य या सर्वांना विश्वासात घेण्यात आले.

या सगळ्या यंत्रणांच्या साह्याने हे सहभागाचे प्रारूप यशस्वी होऊ शकले. ही सर्व प्रक्रिया पार पाडली जात असताना कोणतीही वैद्यकीय किंवा आरोग्य आणीबाणी उद्भवली तर तातडीने प्रतिसाद देता यावा यासाठी ३ हजार व्हॉट्सऍप ग्रुप तयार करण्यात आले. वैजापूर तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ७५ हजार एवढी आहे. गावागावांत विखुरलेल्या या सर्वांनी सामजिक अंतराच्या नियमाचे कडकडीत पालन केले, काटेकोर अंमलबजावणीमुळे कोरोना योद्ध्यांवरील कामाचा ताण आपसूकच कमी झाला आहे.

या कोरोना योद्ध्यांना त्यांच्या कर्तव्याचे पालन करताना कोणत्याही अडचणी येत नाहीत. एकीकडे उर्वरित ठिकाणच्या पोलिस, आरोग्यसेवक, वैद्यकीय कर्मचारी यांना अविश्रांत काम करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, वैजापुरातील कोरोना योद्ध्यांना कामादरम्यान आवश्यक विश्रांतीही मिळत आहे.

सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी हे दोन दिवस जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याचे काम आपल्या हाती घेतले. त्यावेळी पंचक्रोशीतील सर्व दुकाने आणि इतर संस्थांची कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांची जागा ८० स्वयंसेवकांनी घेतली आणि आठ गस्ती चौक्यांवर त्यांनी पोलिसांचे कर्तव्य बजावले. एका सरकारी डॉक्टरच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा ताबा खासगी डॉक्टरांनी घेतला आणि बाह्यरुग्ण तपासणी सत्र चालवले. खासगी डॉक्टरांना पीपीई किट्स उपलब्ध करून देण्यात आला होता.

६० हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वैजापूर शहरासह वैजापूर तालुक्यात २१८ गावे आहेत. मात्र, असे असले तरी तालुक्यात आतापर्यंत एकही कोरोनाबाधित आढळून आलेला नाही. परंतु वैजापूर तालुका औरंगाबाद जिल्ह्याचा भाग असल्याने सर्व दक्षता बाळगण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यात राबविण्यात आलेल्या प्रयोगाचे महत्त्व अधोरेखित होते.

सगळ्यांच्या सहभागाने यश..

कुठालही उपक्रम सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे मी नगराध्यक्षांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नेते, प्रशासनातील अधिकारी यांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता. कोरोनाच्या संकटात लढणाऱ्या योद्ध्यांना काही काळ विश्रांती मिळावी आणि तालुका कोरोनामुक्तच राहावा या हेतूने हा उपक्रम आम्ही हाती घेतला.

तहसिलदार, डीवायएसपी यांची रितसर परवानगी घेऊन अत्यंत नियोजित पध्दतीने ९ व १० मे रोजी आम्ही कडकडी लॉकडाऊनचे पालन केले. लोकांनी मोलाची साथ दिली, त्यामुळे आरोग्य, पोलिस व प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला आणि सगळ्या नाही, पण काही कोरोना योद्ध्यांना विश्रांती देण्यात आम्हाला यश मिळाले. आता पुन्हा १६ व १७ मे रोजी आम्ही हा उपक्रम पुन्हा तालुक्यात राबवत असल्याचे आमदार रमेश बोरनारे यांनी सांगितले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in