चाकरमान्यांना योग्य वागणूक द्या; पालकमंत्री सामंत यांच्या सूचना

गणेश उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करून प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करता येणाऱ्या चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशासूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत
Uday Samant Takes meeting ahead of Ganpati Festival in Konkan
Uday Samant Takes meeting ahead of Ganpati Festival in Konkan

ओरोस : मुंबई-पुण्याहून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना प्रशासनाने आपुलकीची वागणूक द्यावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाला केल्या आहेत.  गणेश मूर्ती दोन फुटांची असावी, असा नियम करण्यात आला असला तरी कोकणात मोठ्या मुर्तींची परंपरा आहे. या मूर्ती सहा ते सात महिन्यांपूर्वीपासून निश्‍चित केलेल्या असतात. त्यामुळे गणेश मुर्तीच्या उंचीवरून कारवाई करू नये, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. 

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर प्रशासनाने केलेली तयारी आणि कोरोना उपाययोजना संदर्भात नियोजन समितीच्या नवीन सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात उदय सामंत यांनी या सूचना केल्या. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, सर्व तहसीलदार, पोलिस ठाण्यांचे प्रमुख व विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्ह्यातील तपासणी नाक्‍यांवर होत असलेल्या अँन्टीजेन तपासणीचा वेग वाढवावा अशी, सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केली. "गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांची योग्य तपासणी व्हावी. लोकांना ऑक्‍सिजनची पातळी, कोरोनाची लक्षणे यांची सविस्तर माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने लोकांना द्यावी. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. १२ ऑगस्टनंतर येणाऱ्यांना कोविड टेस्ट बंधनकारक आहे. ४८ तासांच्या आत त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करावयाचा आहे; पण त्यानंतर त्यांनी किमान ३ दिवस गृह अलगीकरणात रहावे,'' असे सामंत यांनी सांगितले

ते पुढे म्हणाले, ''उत्सवासाठी येणारे चाकरमानी हे सामान्य नागरिक आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांचे बरेच हाल झाले आहेत. त्यात प्रवास आणि कोविडचा ताण यामुळे त्यांना बराच त्रास सहन करून प्रवास करावा लागणार आहे. याचा विचार करावा व चाकरमान्यांना कमीत कमी त्रास सहन करावा लागेल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी.''

ते पुढे म्हणाले, "चांगले काम केलेल्या ग्रामपंचायतींना रोख रक्कम स्वरुपात बक्षिस देण्यात येईल. यासाठी प्रशासनाने एक समिती स्थापन करावी. सर्व ग्राम कृती समितींच्या कामाचे मुल्यमापन करावे व त्यामध्ये पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक निश्चित करावा. गावांमध्ये ग्रामसेवक व तलाठी उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गणपतीच्या काळात योग्य तो समन्वय साधून नियोजन करावे. सध्या जिल्ह्यातील ६८ सरपंच पदे रिक्त होत आहेत. त्याठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून नेमावे. ही नेमणूक करताना तालुका निहाय चिठ्ठ्या टाकून नेमणूक केली जावी. त्यातून कोणालाही आक्षेप घेण्याचे कारण उरणार नाही.'


सध्या ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडत आहेत, त्याठिकाणी कंन्टेन्मेंट झोन केले जात आहेत. हे झोन जास्तीत जास्त ५० मीटर क्षेत्राचे करावेत, अशी सूचना पालकमंत्री सामंत यांनी यावेळी केली. प्रवाशांकडून जास्तीचे भाडे घेणाऱ्या बस मालकांवर पोलीस आणि आरटीओ या दोन्ही यंत्रणांनी गुन्हा दाखल करावा, असेही त्यांनी सांगितले. २२ पेक्षा जास्त प्रवासी घेऊन येणाऱ्या बसवर कारवाई करताना प्रथम आलेल्या लोकांना त्यांच्या गावी सोडावे व बसचा परवाना निलंबीत करून या बस मालवण येथील पॉलिटेक्‍निकच्या आवारामध्ये ठेवाव्यात, असा सूचनाही सामंत यांनी यावेळी केल्या. यावेळी पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com