चक्क दोघा भावांनी घेतली ९० हजारांची लाच!

दोन भावांना एकाच वेळी पकडण्याची ही पहिलीच वेळ असावी...
चक्क दोघा भावांनी घेतली ९० हजारांची लाच!
acb action in Paithan

औरंगाबाद : कृषक जमीन अकृषकमध्ये (NA) रुपांतरित करण्यासाठी एक लाख ६० हजारांच्या लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ९० हजार स्वीकारताना पैठणच्या भूमापक विभागाचे उपअधीक्षक अनिल विष्णू सावंत व त्याचा सख्खा भाऊ सचिन विष्णू सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बेड्या ठोकल्या. ही कारवाई सोमवारी (ता.९) रात्री करण्यात आली. (ACB Nabs two brothers for taking bribes in Paithan) 

स्थापत्य अभियांत्रिकीचे सल्लागार असलेल्या तक्रारदाराकडे त्यांच्या पक्षकाराच्या कृषक जमिनीचे अकृषक जमिनीत रुपांतरित करण्यासह जागेचा रेखांकन नकाशा बरोबर आहे की नाही, हे पाहण्याचे काम भूमापक विभागाकडे होते. तसेच रेखांकन नकाशासह सीमारेषाही आखून देण्याचे काम करायचे होते. सदर काम पैठणचा भूमापक उपअधीक्षक अनिल सावंत याच्याकडे होते. या कामापोटी तक्रारदाराच्या पक्षकाराकडून सावंतने पूर्वीच ६० हजार रुपये घेतले होते. त्यानंतर पुन्हा एक लाखाची मागणी सावंतकडून करण्यात येत होती.

त्यासंदर्भातील तक्रार औरंगाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली. तक्रारीची शहानिशा करून सोमवारी एसीबीचे पोलीस निरीक्षक गणेश धोक्रट यांच्या पथकाने सापळा रचून भूमापक उपअधीक्षक अनिल सावंत व त्याचा खासगी ठेकेदार असलेला भाऊ सचिन सावंत यांना ९० हजार रुपये घेताना पकडले. दोघांना मंगळवारी (ता.१०) न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

Related Stories

No stories found.