तुकाराम मुंढे म्हणाले, "All is Well.."

मुंढे यांची कोविड चाचणी पॅाझिटिव्ह आली होती. मुंढे हे सध्या होम क्वारंटाइन आहेत. याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबूकवर शेअर केली आहे.
427_4.jpg
427_4.jpg

पुणे : कठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्तपदावरून आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून बदली झाली आहे. मुंढे यांची कोविड चाचणी पॅाझिटिव्ह आली होती.  मुंढे हे सध्या होम क्वारंटाइन आहेत. याबाबतची पोस्ट त्यांनी फेसबूकवर शेअर केली आहे. 

आपल्या पोस्टमध्ये तुकाराम मुंढे म्हणतात, "मागील साडे पाच महिने कोरोनाशी लढत असताना २४ ऑगस्ट रोजी माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आली. लक्षणे नसल्यामुळे मात्र पॉझिटिव्ह आल्याने शासनाच्या गाईडलाईन्सनुसार मी स्वतःला गृह विलगीकरणात ठेवले. या काळात गृह विलगीकरणाचे सर्व नियम मी पाळत आहे. मास्क लावणे, कुटुंबातील कुठलाही सदस्य मी असलेल्या खोलीत न येणे, व्हिटॅमिन सी, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक गोळ्यांचे सेवन करणे, थर्मल स्कॅनिंग द्वारे ठराविक काळानंतर शरीराचे तापमान तपासणे आदी सर्व दिशानिर्देशांचे पालन करीत आहे. ज्यांना-ज्यांना लक्षणे नाहीत मात्र ते पॉझिटिव्ह आले आहेत, अशा सर्वांनी गृह विलगीकरणाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे. आपणापासून इतरांना संक्रमण होणार नाही, याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छा सोबत आहेतच. या शुभेच्छासोबतच सर्व नियम पाळत विलगीकरणाचा काळ मी पूर्ण करेन, असा विश्वास देतो.All is Well...!" 

मुंढे यांच्या 15 वर्षांतील प्रशासकीय कारकिर्दतील पंधराव्या बदलीचा आदेश नुकताच जारी झाला. नागपूर येथे ते जेमतेम सहा महिने काम करू शकले. नेत्यांशी त्यांचे जमत नाही, असा नेहमीच त्यांच्याबद्दल तक्रारीचा सूर असतो. आता जीवन प्राधिकणारत तर  पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि मुंढे या दोघांना एकत्र काम करावे लागणार आहे. प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून या प्राधिकरणाची प्रमुख जबाबदारी आहे. नगरपालिका आणि मोठ्या गावांतील पाणीपुरवठा योजनांचे काम मार्गी लावण्याचे काम या प्राधिकरणाकडे आहे. ग्रामीण भागातील पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या योजनेचे काम हे प्राधिकरण करते.

नाशिक पालिका आयुक्तपदावरून त्यांची नियोजन विभागात बदली झाली तेव्हा तर तत्कालीन अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटिवार यांच्याशी त्यांचे फार जमू शकले नाही. मुंढे सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना तेथील पालकमंत्री विजय देशमुख हे त्यांच्याबद्दल तक्रारी करत होते. त्यांनी पुणे, नवी मुंबई, नाशिक आणि नागपूर या महापालिकांत काम केले. तेथील नेत्यांनी मुंढेबद्दल नेहमीच नाराजीचा सूर लावला.

मुंढेंना गुलाबरावांशी समन्वय ठेवून काम करावे लागणार आहे. गुलाबरावही बोलण्यासाठी आक्रमक आणि फटकळ म्हणून ओळखले जातात. मुंढे हे ज्या प्रमाणे अतिशय गरिबीतून शिक्षण घेऊन आयएएस अधिकारी झाले तसेच गुलाबरावही हलाखीच्या परिस्थितीतून मंत्रिपदावर पोहोचले आहेत. ते 1999 मध्ये तेव्हाच्या एरंडोल मतदारसंघातून प्रथम आमदार झाले. 2009 ते 2014 चा अपवाद वगळता ते आमदार राहिले आहेत. आता ते जळगाव ग्रामीण या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आधीच्या पिढीतील शिवसैनिकांकडे असलेला तापटपणा त्यांच्याकडेही भरपूर आहे. त्यामुळेच या दोघांची जोडी कशी जमणार, याची उत्सुकता आहे.
Edited  by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com