रेल्वे सुरू, प्रवासी गायब; नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्या रिकाम्या.. - Train starts, passenger disappears; More than half of the trains running through Nanded division are empty | Politics Marathi News - Sarkarnama

रेल्वे सुरू, प्रवासी गायब; नांदेड विभागातून धावणाऱ्या गाड्या रिकाम्या..

जगदीश पानसरे
मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020

रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. साप्ताहिक आणि दररोज धावणाऱ्या रेल्वेचे आरक्षण सुरू असूनही २० ते ८० टक्क्यांपर्यंतचे आरक्षण शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्सव विशेष व इतर रेल्वे गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

औरंगाबाद ः कोरोना संकटामुळे सहा महिन्यांहून अधिक काळ देशातील रेल्वे सेवा बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलाॅक अंतर्गत परिस्थीती पुर्वपदावर यावी यासाठी केंद्राने काही प्रमाणात रेल्वे सुरू केल्या आहेत. नांदेड विभागाच्या वतीने सध्या ११ रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. पण लोकांच्या मनातील कोरोनाची भिती अजूनही पुर्णपणे गेलेली नसल्याने या सर्व गाड्या नि्म्याहून अधिक रिकाम्य़ा धावत आहेत. दिवाळी निमित्त काही विशेष रेल्वे देखील सोडण्यात आल्या आहेत, मात्र प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने अनेक गाड्या ८० टक्के रिकाम्या धावत आहेत. 

कोरोना या जागतिक महामारीचा फटका आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात बसला. सात महिन्यानंतर आताकुठे परिस्थिती काहीशी आटोक्यात आली आहे. शिवाय इतक्या प्रदीर्घ काळ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहिल्याने देशाचे व राज्याचे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले. अनलाॅक आणि मिशन बिगिन अंतर्गत राज्यात हळूहळू बस, रेल्वे, विमान सेवा सुरू करण्यात येत आहे.

दक्षिण- मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने देखील विविध राज्यांसाठी अकरा रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यात काही उत्सव विशेष गाड्यांचा देखील समावेश आहे. परंतु अजूनही रेल्वे गाड्यांना प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. साप्ताहिक आणि दररोज धावणाऱ्या रेल्वेचे आरक्षण सुरू असूनही २० ते ८० टक्क्यांपर्यंतचे आरक्षण शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उत्सव विशेष व इतर रेल्वे गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

नांदेड विभागाकडून सध्या तिरुपती-अमरावती, हैदराबाद-जयपूर, पुर्णा- पटना, अकोला-काचीगुडा, नारखेर- काचीगुडा, नांदेड-पनवेल, धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस, औरंगाबाद- हैदराबाद, परभणी-हैदराबाद,नांदेड-मुंबई, नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस या अकरा रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. या गाड्यांच्या बावीस फेऱ्यांचे आरक्षण निम्याहून अधिक शिल्लक असल्याचे रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख