टुर निघाली रावसाहेब दानवेंच्या भेटीला; बंगला, महाराष्ट्र सदन, रेल्वे गेस्ट हाऊस फुल्ल..
Bjp Leader and Minister Raosaheb Danve News Jalna

टुर निघाली रावसाहेब दानवेंच्या भेटीला; बंगला, महाराष्ट्र सदन, रेल्वे गेस्ट हाऊस फुल्ल..

शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील बंगल्यात मोठा मंडप टाकण्यात आला.

भोकरदन ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना दिल्लीत जाऊन भेटणाऱ्यांची आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या काही कमी होईना. मंत्रीमंडळ विस्तार होऊन तीन आठवडे उलटले तरी दानवे यांच्या मतदारसंघातून त्यांना दिल्लीत भेटण्यासाठी जाणाऱ्यांची गर्दी काही कमी होतांना दिसत नाहीये. (The tour started to meet Raosaheb Danve) भाजपचे तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भोकरदन येथून नुकतेच ५० कार्यकर्ते  खाजगी बसने दिल्ली रवाना झाले आहेत.

विशेष म्हणजे दररोज दिल्लीला उडणाऱ्या विमानात औरंगाबादेतून दानवेंना भेटण्यासाठी जाणाऱ्यांची संख्या २५ ते ३० असते असेही बोलले जाते. (Bjp Activits  and Railway State Minister Raosaheb Danves Sapoters In Dehli) मोदींच्या नेतृत्वाखालील मंत्रीमंडळ विस्तारात काही जुन्या मंत्र्यांना डच्चू देऊन नव्यांना संधी देण्यात आली. प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्या सारख्या दिग्गज मंत्र्यांना वगळण्यात आले. तब्बल अकरा मंत्र्यांचे राजीनामे घेऊन त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली.

या विस्ताराच्या वेळी केंद्रात आधीच अन्न-पुरवठा खात्याचे मंत्री असलेले रावसाहेब दानवे यांच्या राजीनाम्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र नंतर ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले. उलट मोदी सरकारमध्ये रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे,कोळसा व खाण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

रेल्वे खाते मिळाल्याने समर्थक खूष..

त्यामुळे मंत्रीपद राहते की जाते, अशा परिस्थितीवर यशस्वीरित्या मात करत आपल्या पक्षांतर्गंत व बाहेरच्या विरोधकांना चकवा देण्यात दानवे पुन्हा एकदा यशस्वी ठरले. मंत्रीपद कायम राहून त्यात महत्वाची जबाबदारी आणि रेल्वे सारखे खाते मिळाल्यामुळे सध्या दानवे व त्यांचे समर्थक चांगलेच खूष आहेत.

या आनंदाच्या भरातच केवळ जालना लोकसभा मतदारसंघच नाही, तर औरंगाबाद, पुणे व राज्यातील दानवे समर्थकांनी सध्या दिल्ली वारी सुरु केली आहे. जालना व भोकरदन येथून जाणाऱ्यांची संख्या तर लक्षणीय आहे. आतापर्यंत दानवे यांना दिल्लीत जाऊन शुभेच्छा देणाऱ्यांची संख्या हजारावर गेल्याचे बोलले जाते. यात विमानाने दिल्लीला जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

दिल्लीवारीचा हा सिलसिला अद्यापही सुरूच असून दानवेंकडून देखील पदाधिकारी,कार्यकर्त्यांची व्यवस्था केली जात आहे. शुभेच्छा द्यायला येणाऱ्यांची गर्दी वाढत असल्याने रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील बंगल्यात मोठा मंडप टाकण्यात आला असून एका भल्यामोठ्या हाॅलमध्ये या कार्यकर्त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत असल्याचे समजते. 

कार्यकर्त्यांची चंगळ..

दिल्लीत दानवेंना भेटणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सध्या महाराष्ट्र सदन, रेल्वे गेस्टहाऊसमध्ये देखील गर्दी वाढली आहे. भेटायला येणाऱ्या एकाही कार्यकर्त्याची गैरसोय होऊ नये यासाठी रावसाहेब दानवे स्वतः लक्ष ठेवून असतात. पदाधिकाऱ्यांना रेल्वेभवनासह दिल्लीत महत्वाच्या ठिकाणी ट्रीप घडवून आणण्यासाठी दानवे यांच्याकडून वाहनांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सध्या दानवे यांच्या दिल्लीत बंगल्यात रोज किमान शंभर जणांच्या पंगती उठत आहेत. या शिवाय हाॅटेलमधून जेवण मागवून कार्यकर्त्यांना दिले जात आहे. एकंदरित रावसाहेब दानवे यांचे मंत्रीपद कायम राहून त्यांच्याकडे रेल्वे खाते आल्यामुळे त्यांच्या समर्थकांसाठी ही पर्वणी ठरत असून दिल्लीत पर्यटन आणि दानवेंना शुभेच्छा अशा दुहेरी संधीचा पुरेपूर लाभ ते उठवत आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Related Stories

No stories found.