अपहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांनी आता ते सिध्द करून दाखवावेत.. - Those who are accused of embezzlement should now prove it | Politics Marathi News - Sarkarnama

अपहार झाल्याचे आरोप करणाऱ्यांनी आता ते सिध्द करून दाखवावेत..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

अपहार झाल्याचा जो आरोप केला जात आहे तो निखलास खोटा आणि बिनबुडाचा आहे. ज्यांच्या नावे कारखान्याचे पैसे जमा आहेत, त्यांना ज्या सभासद शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे डिपाॅझीट दिले होते त्यांनीच व्यवहाराचे अधिकार दिले आहेत. त्यानूसार संबंधितांनी दोनशे-तीनेशे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केले आहेत. त्यामुळे यात अपहार झाला हे म्हणणे चुकीचे आहे.

औरंगाबाद ः माझ्यावर दाखल झालेला गुन्हा हा राजकीय दबाव आणि सुड भावनेतून करण्यात आला आहे. अपहार केल्याचे कुठलेही पुरावे न देता गृहमंत्री व सरकारी दबाव आणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण मी अशा प्रकारची बदनामी कदापी सहन करणार नाही, ज्यांनी अपहार झाल्याचा आरोप केला आहे, त्यांना आता तो सिद्ध करावा लागेल, असे आव्हान भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आरोप करणाऱ्यांना दिले आहे.

गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत बंब व प्रभारी संचालक एम.बी. पाटील यांनी संगनमताने १५ कोटी ७५ लाखांचा अपहार केल्याचा आरोप कारखान्याचे सभासद कृष्णा पाटील डोणगांवकर यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात काल (ता.१८) रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात प्रशांत बंब यांच्यासह १६ जणांविरुद्ध बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानूसार बंब यांच्यासह अन्य सोळा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात प्रशांत बंब यांनी आपली बाजू मांडताना दाखल करण्यात आलेला गुन्हा हा बेसलेस आणि कुठल्याही पुराव्याशिवाय दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. बंब म्हणाले, राज्यातील ३५ सहकारी साखर कारखाने हे खाजगी लोकांच्या घशात जाणार होते. त्यापैकी पाच सहा कारखाने जे वाचवले त्यात गंगापूर सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. हा कारखाना देखील जयंत पाटील यांना विकण्यात आला होता. पण आपण तो पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात दिला.

अपहार झाल्याचा जो आरोप केला जात आहे तो निखलास खोटा आणि बिनबुडाचा आहे. ज्यांच्या नावे कारखान्याचे पैसे जमा आहेत, त्यांना ज्या सभासद शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे डिपाॅझीट दिले होते त्यांनीच व्यवहाराचे अधिकार दिले आहेत. त्यानूसार संबंधितांनी दोनशे-तीनेशे सभासद शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देखील जमा केले आहेत. त्यामुळे यात अपहार झाला हे म्हणणे चुकीचे आहे.

कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत, मशनिरीची आॅर्डर देखील आम्ही लवकरच देणार आहोत. हा कारखाना सुरू झाला तर अनेकांचे राजकारण संपणार आहे, आणि त्यातूनच अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप आणि दबावाखाली गुन्हे दाखल केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांनी आता बाप दाखव नाही तर श्राध्द घाल या प्रमाणे आरोप सिद्ध करावेत, अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहावे, असा इशाराही प्रशांत बंब यांनी दिला आहे.

लवकरच आपण सगळ्या पुराव्या आणि न्यायालयीन निर्णयाच्या आधीन राहून आम्ही सगळे व्यवहार कसे केले याची कागदपत्रे घेऊन आमची बाजू मांडणार आहोत. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना आणखी किती आरोप करायचे ते करू देत, पण मी बदनामी कदापी सहन करणार नाही, असेही बंब यांनी स्पष्ट केले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख