ठाकरे सरकारचं कोकणवासीयांकडं दुर्लक्ष ; आशिष शेलारांचा आरोप  - Thackeray government ignores Konkan people | Politics Marathi News - Sarkarnama

ठाकरे सरकारचं कोकणवासीयांकडं दुर्लक्ष ; आशिष शेलारांचा आरोप 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कोकणात जाण्यासाठी वेळेवर गाड्या उपलब्ध केल्या नाहीत आणि येताना रस्त्याची चाळण झाली आहे.

मुंबई : ठाकरे सरकारचं कोकणवासीयांकडे दुर्लक्ष आहे, कोकणात जाण्यासाठी वेळेवर गाड्या उपलब्ध केल्या नाहीत आणि येताना रस्त्याची चाळण झाली आहे, त्यामुळे त्यांचे हाल होत असल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. याबाबत शेलार यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.  

या व्हिडिओमध्ये आशिष शेलार म्हणतात, "ठाकरे सरकार चाकरमान्यांवर आणि कोकणवासीयांवर कुठला राग काढताहेत हेच समजत नाही. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या भक्तांसाठी ई-पास आणून दलालाच्या हातात कोकणवासीयांची मान दिली. वेळेत रेल्वे आणि बसची सेवा सुरू न करता खासगी सेवा घ्यावी लागली. त्यामुळे कोकणवासीयांचा आर्थिक कणा मोडला आहे.

आता ज्यावेळी कोकणातून परत लोकांना घरी यायचं आहे. तेव्हा कोकणाकडं जाणाऱ्या आणि येणाऱ्या रस्त्यांची चाळण, पडलेली खड्डे यामुळे त्यांचे कंबरडे मोडण्याची परिस्थिती आली आहे. माझी सरकारला विनंती आहे की कोकणातून लोक परत येत आहेत. रस्ते दुरूस्त करा, खड्डे बूजवा."  माझी मुंबईच्या महापैारांना विंनती आहे की कोकणातून येणाऱ्या नागरिकांच्या कमरेवर इलाज करण्यासाठी विशेष व्यवस्था करा, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे.  

   
कोविड रूग्णालय बंद करण्यास विरोध.. आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र... 
मुंबई : बोरीवलीचे हिरालाल भगवती रुग्णालय १५ सप्टेंबरपासून कोविड रुग्णांसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, त्यामुळे लोकांची गैरसोय होईल, असे सांगून या निर्णयाचा फेरविचार करा, अशी मागणी दहीसरच्या आमदार मनीषा चौधरी यांनी केली आहे. 

मुंबईतील रूग्णांची संख्या कमी होत असल्याने तसेच प्रशासनाने अनेक ठिकाणी तात्पुरती जंबो कोवीड सेंटर उभारली असल्याने अनेक ठिकाणच्या रुग्णालयांमधील कोविड सेवा आता हळुहळू बंद करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बोरीवलीच्या भगवती रुग्णालयातील कोविड सेवाही बंद करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. त्यामुळे विशिष्ठ तारखेनंतर नवे कोविड रुग्ण घेऊ नका व नंतर राहतील त्या रुग्णांना महापालिकेच्या अन्य कोविड रुग्णालयात किंवा जंबो कोविड सेटंरमध्ये पाठवा, असे त्यांना सांगण्यात आले आहे. या गोष्टीस श्रीमती चौधरी यांनी विरोध केला आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठवले आहे.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख