मुख्यालयी न राहणाऱ्या तहसीलदार छाया पवार निलंबित

तहसिलदार छाया पवार यांनी कोव्हीड - 19 या आपत्ती कालावधीमध्ये मुख्यालयी राहणे आवश्यक असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून ये- जा केल्यामुळे जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
chaya pawar suspend news
chaya pawar suspend news

बदनापूरः कोरोना सारख्या आपत्ती कालावधीत शासनाचे आदेश असूनही मुख्यालयी न राहणे तहसिलदार छाया पवार यांना चांगलेच महागात पडले आहे. रेडझोनमध्ये असलेल्या औरंगाबादहून ये-जा करत जिल्हाबंदीचा नियम मोडण्यासह कामात हलगर्जीपणा व इतर ठपका देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. जालना येथील निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा व्यव्सथापनचे मुख्य कार्यकारी अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी छाया पवार यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

राज्यासह मराठवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे, या पार्श्वभूमीवर जिल्हाबंदी कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोव्हीड-१९ च्या आपत्ती काळात सरकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. पण बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार या बदनापूर येथे न राहता रोज शेजारच्या रेड झोन औरंगाबादमधून ये-जा करत होत्या. नोटीस बजावून देखील पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. अखेर आज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

या संदर्भात एक प्रसिध्दी पत्रक काढून माहिती देण्यात आली असून यात बदनापूरच्या तहसिलदार छाया पवार यांनी कोव्हीड - 19 या आपत्ती कालावधीमध्ये  मुख्यालयी राहणे आवश्यक असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातून ये- जा केल्यामुळे जालना जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. अशा आपत्तीच्या काळात तहसिलदार छाया पवार मुख्यालयात हजर राहणे आवश्यक असताना त्या मुख्यालयी राहत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

एकूणच याशिवाय तहसीलदार पवार यांच्या बाबत विविध अहवाल वरिष्ठ कार्यालयास विहित कालावधीमध्ये सादर न करणे, शासकीय कामात अक्षम्य दुर्लक्ष करणे, दुष्काळी अनुदान मागणीत अनियमितता, नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपात दुर्लक्ष करणे, अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात अनियमितता, गौण खनिजाचे अनधिकृत वाळूसाठे व वाहतुकीवर नियंत्रण न ठेवणे, शासकीय वसुलीबाबत दुर्लक्ष करणे आदी कारणे देखील देण्यात आली आहेत.

दरम्यान, या सर्व कारणांमुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी आज तहसिलदार छाया पवार यांना निलंबित केले असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर केला आहे.  पवार यांना निलंबनाच्या काळात  जालना येथील उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय मुख्यालय म्हणून देण्यात आले आहे. तर पुढील आदेशपर्यंत बदनापूर तहसीलदारपदाचा कार्यभार जालना तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार दिलीप शेणफड सोनवणे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com