मर्यादा 50 लाखांची; मात्र आमदार सुभाष देशमुखांकडून एक कोटीचा विकास निधी खर्चण्याचे प्रशासनाला पत्र!

भाजपचे सोलापूर दक्षिणचे आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या विकास निधीतून कोरोनाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करावा असे पत्र प्रशासनाला दिले आहे.
Subhash Deshmukh gives letter to spend one crore amount from mla fund to combat coronavirus
Subhash Deshmukh gives letter to spend one crore amount from mla fund to combat coronavirus

सोलापूर : भाजपचे सोलापूर दक्षिणचे आमदार, माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी आपल्या विकास निधीतून कोरोनाविरुद्ध मुकाबला करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी खर्च करावा असे पत्र प्रशासनाला दिले आहे. परंतु ही मर्यादा 50 लाख रुपयांची असल्याने त्यांच्या आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. 

माढ्याचे आमदार बबनराव शिंदे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, मोहोळचे आमदार यशवंत माने, सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, पंढरपूरचे आमदार भारत भालके, सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील, माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा निधी खर्च करण्याचे पत्र जिल्हा नियोजन समितीकडे दिले आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी 40 लाख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी 30 लाख तर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी 25 लाख रुपये खर्च करण्याचे पत्र दिले आहे. 

याबाबत सोलापूरचे जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील विधानसभा सदस्यांकडून या कामाबाबत पत्रे मिळाले आहेत.  मिळालेल्या पत्रावर अंदाजपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर या कामांना तांत्रिक मान्यता दिली जाणार आहे. त्यानंतर खरेदीचा मार्ग मोकळा होणार आहे. 

कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाविरुद्धचा मुकाबला करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व विधानसभा सदस्यांनी कमी-अधिक प्रमाणात आपला विकास निधी दिला आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2019-20 व 20-21 या आर्थिक वर्षात कोरोनासंदर्भात वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीबाबत 50 लाख रुपयांच्या मर्यादित निधी खर्च करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. 

विशेष बाब म्हणून ही परवानगी मिळाली असून इन्फ्रारेड थर्मामीटर, पर्सनल प्रोटेक्‍शन इक्वीपमेंट्‌स किट, कोरोना टेस्टिंग किट, आयसीयू व्हेंटिलेटर व आयसोलेशन वॉर्ड क्वारंटाइन वॉर्ड व्यवस्था, वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने कोविड विषाणूमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना करता प्रमाणित केलेली इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदी करता येणार आहे. 

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी विधान मंडळ सदस्यांनी निधीची शिफारस केल्यानंतर जिल्हाधिकारी हे प्रशासकीय मान्यता देणार आहेत. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार हे साहित्य खरेदी करता येणार आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांकरिता फेस मास्क, ग्लोव्हज व सॅनिटायझर खरेदी करण्यात येणार असून याचे वाटप वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पोलिस, तुरुंग, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती) आणि ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत) यांच्या आस्थापनेवर विविध अत्यावश्‍यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना वाटप केले जाणार आहे. 

शासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या महिला संस्था, अनाथाश्रम, दिव्यांग वृद्धाश्रम, निवासी शाळा, वसतिगृह, आश्रम शाळा आदी ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या तसेच निराधार व्यक्ती व गरजू नागरिकांना महिला बचत गटाद्वारे तयार करण्यात आलेले पुनर्वापर योग्य घरगुती पद्धतीने तयार होणारे फेस मास्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com