तर शेतकरी आत्महत्या दुप्पट होतील; शिवसेना आमदाराच्या मुलीचे पंतप्रधानांना पत्र..

आपली नाळ सुद्धा एका शेतकरी कुटुंबातली आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या निर्मितीत संघर्षाला खुप मोठे स्थान आहे, असे आपण सांगता. तोच संघर्ष अशा कायद्यांमुळे आमचा अजीवन भाग बनत आहे. हे जर असेच चालू राहिले तर २०२२ पर्यंत “शेतकरी उत्पन्न” दुप्पट नाही होणार पण “शेतकरी आत्महत्या” मात्र नक्की दुप्पट होतील. पांढरी दिसणारी प्रत्येक गोष्ट साखर नसते ते मिठ पण असू शकते हे तुम्हाला लवकरच ध्यानात येईल,
shivsena mla doughter letter to PM news
shivsena mla doughter letter to PM news

उमरगा : उमरगा - लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या, स्टुंन्डन्ट हेल्पींग युनिटीच्या आंकाक्षा चौगुले यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांवर होणाऱ्या परिणामाची आणि सद्यस्थिती बाबत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. मोदी सरकारने मंजुर केलेल्या आणि त्यावर राष्ट्रपतींनी मंजुरीची मोहर उठवलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्यावरून देशात संभ्रमाचे वातावरण आहे. हे कायदे शेतकरी विरोधातील असल्याचा आरोप देखील केला जात आहे. या पार्श्वभूमीवर एका आमदाराच्या मुलीने पंतप्रधानांना पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या प्रातिनिधक भावना व्यक्त केल्याने या पत्राची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे.

आकांक्षाने या पत्रात म्हटले आहे की, हाडे आणि मांस वेगळे करून जसे व्यायामाचे नियम बनवता येत नाही तसेच शेती आणि शेतकरी यांना वेगळे करून भारतमातेच्या भांगातील हिरवळीचे नियम तरी कसे बनतील? काल-परवा तुमच्या सरकारने तीन विधयेके पारित केली त्यांची नावे जेवढी मोठी आहेत तेवढा त्याचा फायदा आम्हाला मिळेल कि नाही यात शंका आहे. तुम्ही नेहमी म्हणता भारतीय शेतकऱ्यांचा प्रवास हा “कृषक ते कृषीद्योजक ”असा करायचा आहे, पण प्रत्यक्षात मात्र असे काहीच होताना दिसत नाही. या उलट शेतीत येणारी उद्योजकता माती नासवत आहे आणि परिणामी बैलगाड्या पेक्षा चारचाकी गाड्या जास्त वाढत आहेत.

एक एकरातील पिवळ्या दगडाला केव्हा एक तोळे सोन्याच्या हिशोबाने पाहिले जाणार? जर अशी उद्योजकता येणार असेल तर भारतीय शेतीला पुन्हा ब्रिटीशकालीन शेतीचे रूप येईल. आपल्या देशात कोटीत घोटाळा केलेल्यांना बाहेर देशात राहण्याचे स्वतंत्र आहे, पण देशात राहून देशाच पोट भरणाऱ्याला कर्ज घेण्याची चोरी! संविधानिक दृष्ट्या शेतकरी हा प्रवर्ग मागास जरी नसला तरी मोबदला आणि सोयीच्या बाबीत मागासच आहे. आमच्याच दारी अन्न पिकून आम्हीच अन्नाविना कित्येकदा उपाशी आहोत. दैनंदिन गरजा आमची ध्येय आणि स्वप्ने बनत आहे. आधी लेकरू पाटी वाचून शिक्षणापासून वंचित राहायचं आता नेट वाचून राहतंय. त्यात पाऊस आला तरी घर गळत आणि नाही आला तर पिक जळत.

साडेचौदा कोटी शेतकरी तुमच्या बहुमताचाच भाग

आम्ही सरकारी कार्यालयात जाव तर पंचनाम्या पेक्षा पंचायती जादा आणि लाभार्थी योजनाचा पैसा पण भेटत नाही. आधीच रस्त्यावर आलेलो आम्ही, झेंडे घेऊन रस्त्यावर उतरावं तर कायद्याच्या उल्लंघनाचे बळी. साहेब निवडणुकीसाठी आम्ही आपल्यासाठी अग्रक्रमी आहोत पण निवडणुकीनंतर क्रमवारीत पण नाही! कायद्याच्या दृष्टीने २७१ जागा हे बहुमत जरी असले तरी १४.५ कोटी शेतकरी सुद्धा ह्या बहुमताचा भाग आहे हा विचार तुम्ही करायला हवा होता. तुमच्या अशा कित्येक निर्णयामुळे गळ्यातील सुती उपरण्याची जागा सुती दोरी घेत आहे. सावकारापुढे उभ राहील तर अपमानित होऊन निदान दोन पैसे तरी मिळतात, पण सरकारपुढ उभं राहील तर सोमवारी सुद्धा सोमवार उजाडण्याची वाट पहावी लागते.

ह्या सगळ्यामुळ इथ छकुलीला घेऊन शेजारच्या गावात जत्रेला जाता येत नाही, दुसऱ्या राज्यात माल विकायला जाणार कस? तुम्ही म्हणता आता बाजार समिती सोडून बाहेर सुद्धा माल विकता येईल, तुम्ही सांगाल तो भाव मिळेल. पण आमचा पोशाख बघून आमची किंमत ठरवणारी हि भांडवलशाही व्यवस्था आम्ही सांगु त्या किमतीला माल घेईल? साहेब आपल्या देशात सत्विकतेपेक्षा चटपटीत गोष्टीला जास्त मागणी आहे आणि हे कष्टाच्या बाबतीत पण सारखाच लागू होत. पंतप्रधान ह्या पदाकडे सारा देश मानाचे पद म्हणून पाहतो, पण आम्ही ह्याकडे जबाबदारी आणि दायीत्वाचे पद म्हणून पण पाहतो.

आपली नाळ सुद्धा एका शेतकरी कुटुंबातली आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या निर्मितीत संघर्षाला खुप मोठे स्थान आहे, असे आपण सांगता. तोच संघर्ष अशा कायद्यांमुळे आमचा अजीवन भाग बनत आहे. हे जर असेच चालू राहिले तर २०२२ पर्यंत “शेतकरी उत्पन्न” दुप्पट नाही होणार पण “शेतकरी आत्महत्या” मात्र नक्की दुप्पट होतील. पांढरी दिसणारी प्रत्येक गोष्ट साखर नसते ते मिठ पण असू शकते हे तुम्हाला लवकरच ध्यानात येईल, अशी आशा करते आणि निदान उत्तराच्या पत्रात तरी न्याय द्याल अशी अशा करते.
                                                                 
आपला देशवासी...

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com