काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा सोबत घेतल्यामुळे शिवसेनेने भगव्याचे शुद्धीकरण करावे.. - Shiv Sena should purify saffron as it carries Congress-NCP flag | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा सोबत घेतल्यामुळे शिवसेनेने भगव्याचे शुद्धीकरण करावे..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

शिवसेनेची कार्यपद्धती, मनोवृत्ती ही इंग्रजाच्या काळात जशी होती तशीच आहे. त्यांच्या ध्यानी, मनी युनीयन जॅक असेल म्हणूनच ते अशी भाषा वापरत आहेत. मुळात काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा शिवसेनेच्या भगव्यामध्ये मिसळल्यामुळे त्यांनीच आपल्या भगव्याचे शुद्धीकरण केले पाहिजे. शिवसेनेने हिंदुत्व तर सोडलेच आहे, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती, तिला देखील तिलांजली दिली आहे.

औरंगाबाद ः मुंबई महापालिकेवर भगवाच फडकेल पण तो भाजपचा असेल असा दावा भाजपच्या काल झालेल्या मुंबईतील बैठकीत करण्यात आला. त्यावर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया देत संजय राऊत यांनी तो भगवा नाही, तर युनियन जॅक असेल, अशी टिका केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर देत तुमच्या भगव्या सोबत आता काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा सोबत आल्यामुळे तुम्हीच भगव्याचे शुद्धीकरण करून घ्या, असा टोला लगावला.

राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुंबईत काल झालेल्या कार्यकारणी बैठकीत माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर चांगलेच तोंडसुख घेतले. मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर शिवसेनेचे संजय राऊत यांनी त्यांच्या या विधानाची खिल्ली उडवतांना महापालिकेवर भाजपचा भगवा नाही तर तो युनियन जॅक असेल असा चिमटा काढला होता.

संजय राऊत यांच्या या टिके बद्दल भाजप आमदार आशिष शेलार यांना औरंगाबादेत पत्रकारांनी छेडले असता, ते म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारची विशेषतः शिवसेनेची कार्यपद्धती, मनोवृत्ती ही इंग्रजाच्या काळात जशी होती तशीच आहे. त्यांच्या ध्यानी, मनी युनीयन जॅक असेल म्हणूनच ते अशी भाषा वापरत आहेत. मुळात काॅंग्रेस-राष्ट्रवादीचा झेंडा शिवसेनेच्या भगव्यामध्ये मिसळल्यामुळे त्यांनीच आपल्या भगव्याचे शुद्धीकरण केले पाहिजे.

शिवसेनेने हिंदुत्व तर सोडलेच आहे, पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती, तिला देखील तिलांजली दिली आहे. ज्या काॅंग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केली, त्याच काॅंग्रेस सोबत सत्तेत जाऊन बसलेली शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत असेल तर याचे उत्तर त्यांना जनतेला द्यावे लागेल, असेही शेलार म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख