शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमविण्याच्या नादात; मंत्री घुमरेंसमोर पक्षांतर्गत खदखद

बीडमध्ये पक्षाची अवस्था बिकट असल्याचा इशारा..
शिवसेना पदाधिकारी फक्त पैसे कमविण्याच्या नादात; मंत्री घुमरेंसमोर पक्षांतर्गत खदखद
Sandipan Bhumare

बीड : आपले दैवत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविरोधात कोणी बोलले तर आम्ही सहन करणार नाहीत. आम्ही तीव्र आंदोलन करु, मात्र सर्व आघाड्यांच्या जिल्हाप्रमुखांना सोबत पाठवा. कारण, ते फक्त पैसे कमविण्याच्या नादात आहेत. सगळ्यांचे आपापले धंदे सुरु आहेत. नारायण राणेंविरुद्धच्या आंदोलनाला दोन्ही जिल्हाप्रमुख नव्हते, अशी खदखद आणि पक्षांतर्गत कपडेफाड खुद्द शिवसेनेचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यासमोर उघड झाली.

श्री. घुमरे यांच्या उपस्थितीत आगामी नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक आयोजित केली. मात्र, काही शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांचे धंदेच समोर आणले. त्यामुळे पक्षांतर्गत खदखदीपेक्षा उपस्थित केलेले मुद्दे पक्षाला विचार करायला लावणारे आहेत हे महत्वाचे. आता याकडे पक्ष कशा पद्धतीने पाहणार आणि काय पावले उचलणार हे पहावे लागेल.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी शिवसेनेचे सर्वत्र आंदोलने झाली. जिल्ह्यातही कडवट शिवसैनिकांनी तिव्र आंदोलने केली. परंतु, आंदोलनामध्ये कुठेच दोन्ही जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे व अप्पासाहेब जाधव यांचा सहभाग नव्हता. नेमका हाच मुद्दा उपजिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांनी संदीपान भुमरे यांच्यासमोर उपस्थित केला. संतापाच्या भरात आम्ही राणेच्या दोन्ही मुलांना मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असेही ते बोलून गेले. पण, याच वेळी त्यांनी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा भांडाफोडही केला. उद्धव ठाकरे आपले दैवत आहेत. त्यांच्या विरुद्ध कोणी बोलले तर आम्ही सहन करणार नाही. आम्ही घरात घुसून मारु, तीव्र आंदोलन करु. पण, सर्व आघाड्यांच्या जिल्हा प्रमुखांना आमच्यासोबत पाठवा. कारण, ते फक्त पैसे कमविण्याच्या नादात आहेत, त्यांचे धंदे आहेत, असेही वरेकर म्हणाले. आष्टी तालुका प्रमुख भाऊसाहेब लटपटे यांनीही आमच्या आष्टी - पाटोद्यात शिवसेनेचा संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. जिल्हाप्रमुख केवळ आम्ही बोलविले तर येतात. मात्र, त्यांनी स्वत:हून यावे असे सांगीतले. उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी हद्दपारी झाली असल्याची खदखद व्यक्त केली. पक्ष जर अशा वेळी मागे राहत नसेल तर काम कसे करणार, असा सवाल उपस्थित केला.

Related Stories

No stories found.