धनंजय मुंडे प्रकरणावर अजितदादा पहिल्यांदाच बोलले... - Sharad Pawar will take the right decision only after the police investigation into the Munde case | Politics Marathi News - Sarkarnama

धनंजय मुंडे प्रकरणावर अजितदादा पहिल्यांदाच बोलले...

कल्याण पाचांगणे
सोमवार, 18 जानेवारी 2021

मुंडे प्रकरणाची पोलिस चौकशी झाल्यानंतरच पवारसाहेब त्यावर योग्य निर्णय घेतील

माळेगाव (जि. पुणे) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केले आहे. मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असले तरी आरोप केलेल्या महिलेविरुध्दही आरोप झाले आहेत. या प्रकरणाची पोलिस चौकशी झाल्यानंतरच पवारसाहेब योग्य तो निर्णय घेतील, असे अजित पवार म्हणाले.

माळेगाव खुर्द (ता.बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संशोधन संस्थेत कृषी तंत्रज्ञान सप्ताहच्या उद्घाटनानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंडे प्रकरणावर सावध भुमिका मांडली. ते म्हणाले, मुंडे यांच्यावर महिलेने केलेल्या आरोपांबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. महिलेने त्यांच्यावर केलेले आरोप गंभीर असले तरी भाजप व मनसेचे एक नेते, तसेच एका अधिकाऱ्यानेही संबंधित महिलेविरुद्ध विविध आरोप केले आहेत. संबंधित प्रकरणाची पोलिस चौकशी झाल्यानंतरच स्वतः पवारसाहेब यावर योग्य तो निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलताना पवार यांनी महाविकास आघाडीला चांगले यश मिळाल्याचे सांगितले. राज्यातील ग्रामपंचायतीच्या निकालाबाबत चांगले चित्र दिसत असून आम्ही समाधानी आहोत. कर्जत-जामखेडमध्ये माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावची ग्रामपंचायतच त्यांच्या विरोधात गेल्याचे पवार म्हणाले.

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न समजून न घेता केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत आहे. आता चर्चा न करता ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. पण केंद्राला शेतकऱ्यांबद्दल आत्मीयताच राहिली नाही. 

पवारसाहेब, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कृषी कायद्यांविरोधात आंदोलन केले जाईल, असेही पवार यांनी सांगितले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख