शरद पवारांना मराठा समाजा व्यतिरिक्त इतरांचे प्रश्न साेडवायला वेळ.. - Sharad Pawar has time to solve the problems of others besides the Maratha community | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

शरद पवारांना मराठा समाजा व्यतिरिक्त इतरांचे प्रश्न साेडवायला वेळ..

दत्ता देशमुख
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

अशोक चव्हाण मराठा आरक्षणा संदर्भात कुंभकर्णाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली. मराठा समाजाला बरबाद करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का, याचे उत्तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्यावे.

बीड: सरकार मधील मंत्री विजय वडेट्टीवार संविधनाचा भंग करताहेत, त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार मध्ये ठेवलं कस? त्यांना काढून टाकायची आपल्यात हिंमत नसेल तर सरकार चालवायला आपण सक्षम नाहीत असे आम्ही समजू. सत्तेचा मोह असल्यामुळे तुम्ही गप्प आहात. मात्र, माझ्या पश्चात शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली, याचे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना दुःख होत असेल, अशी तिखट टिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी केली. शरद पवारांना मराठा समाज सोडून इतर समाजांचे प्रश्न सोडवायला वेळ असल्याची टिकाही मेटे यांनी यावेळी केली.

गुरुवारी (ता. पाच) शहरात मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेटे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. परिषदेला गायकवाड आयोगाचे माजी सदस्य व माजी कुलगुरु सर्जेराव निमसे, सर्वोच्च न्यायालयातील विधिज्ञ श्रीराम पिंगळे, ॲड. अमोल करांडे, नारायगणडाचे मठाधिपती शिवाजी महाराज, लक्ष्मण महाराज मेंगडे, लक्ष्मण महाराज रामगडकर, सनदी लेखापाल बी. बी. जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या मुद्याला हात घालत मेटे यांनी सुरुवातीलाच अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. मेटे म्हणाले, मंत्री अशोक चव्हाण मराठा आरक्षणा संदर्भात कुंभकर्णाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली. मराठा समाजाला बरबाद करायचं काम अशोक चव्हाण करत आहेत का, याचे उत्तर मंत्री बाळासाहेब थोरात यांनी द्यावे. वडेट्टीवार यांना ओबीसीचा मसिहा बनायचं आहे म्हणून इतर समाजला ते दूषणे देत आहेत. मात्र तुम्ही मराठा समाजाचे वाईट चिंतु नका, असा टोलाही लगावला.

एसईबीसीचे आरक्षण मिळेपर्यंत इडब्लूएसचे आरक्षण द्यावे. आठ दिवसांत आरक्षण नाही दिले तर १७ तारखेला सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करणार असल्याचे मेटे यांनी सांगीतले. खासदार शरद पवार यांना मराठा समाज सोडून इतर समाजांचे प्रश्न सोडायला वेळ आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राष्ट्रवादीला बैठक घ्यायला वेळ नाही, तर काँग्रेस आरक्षणाच्या विरोधात आहे, असा आरोप करत महाविकास आघाडी सरकार आरक्षण देणार नाही, असा दावाही मेटे यांनी यावेळी केला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख