माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन - Satlingappa Mhetre has passed away | Politics Marathi News - Sarkarnama

माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे वडील सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे निधन

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 3 ऑक्टोबर 2020

कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री निधन झाले.

अक्कलकोट (सोलापूर) : कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती सातलिंगप्पा म्हेत्रे (वय 90) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी रात्री निधन झाले.  माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे व कॉंग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे ते वडील होत. 

ते दुधनीचे माजी नगराध्यक्ष होते. सुमारे चाळीस वर्ष त्यांनी दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणूनही कामकाज पाहिले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुमारे 55 वर्षापेक्षा जास्त वर्ष  दुधनी नगरपालिकेवर सत्ता राखण्यात त्यांनी यश मिळविले होते. तालुक्‍याचे पितामह व कणखर नेते म्हणून  सातलिंगप्पा हे ओळखले जात होते. कर्नाटक राज्यातील आळंद, अफजलपूर, विजापूर व गुलबर्गा या भागात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. जिल्ह्याच्या राजकीय, सामाजिक, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. 

अक्कलकोट तालुक्‍यासह दुधनी नगरपरिषदची नूतन प्रशासकीय इमारतीसाठी त्यांनी सरकारकडून निधी मिळवून दिला होता. आज दुपारी अडीच वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. दुधनी येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून दुधनी येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित लेख