विलासरावांची पायरी पृथ्वीराजबाबांनी चढली आणि समझोता एक्सप्रेस धावली

राज्यातील काँग्रेसमध्ये सरकारमधील हेव्यादाव्यातून वाद सुरू असताना सातारा जिल्ह्यातील काँग्रेसमध्येवैरत्व विसरून दोन काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.
Prithviraj Chavan and Vilasrao Patil Undalkar
Prithviraj Chavan and Vilasrao Patil Undalkar

कऱ्हाड : बेरजेचे राजकारण आणि काँग्रेसची पक्ष संघटना मजबूत करताना सातारा जिल्ह्यातील दोन ज्येष्ठ नेत्यांतील विळ्या भोपळ्याचे वैर संपविणे गरजेचे आहे. हे ओळखून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांच्या घरी जाऊन काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि गृहमंत्री सतेज पाटील यांनी चर्चा केली. या भेटीत विधान परिषदेच्या जागेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात असले तरी विलासराव पाटील-उंडाळकर यांचे चिरंजीव ॲड. उदयसिंह पाटील यांना विधान परिषदेवर घेण्याबाबत काँग्रेसकडून पेरणी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे वैर राज्यातील राजकीय वर्तुळात सर्वश्रुत आहे. राजकीय संघर्षामुळे आणि कऱ्हाड दक्षिण मतदार संघातील वर्चस्वातुन या दोघांच्या गटात दरी निर्माण झाली. पृथ्वीराज बाबा दिल्लीत आणि विलासकाका राज्यात वकुब गाजवत असल्याने दोन्ही गटांनी मागे पाहिलेच नाही. परिणामी दोन्ही गटात पडलेली दरी वाढतच जाऊन ती टोकाला गेली. त्यातुन अनेक आरोप-प्रत्यारोपाचा त्यांना सामना करावा लागला.

मात्र तरीही दोन्ही गट आपल्या भुमिकेवर ठाम राहिल्याने कोणीच मिळते जुळते न घेतल्याने त्याची धग कालपर्यंत कायमच होती. मात्र, कालच्या बैठकीनंतर श्री. चव्हाण आणि श्री. उंडाळकर गटात समजोता एक्सप्रेस धावणार हे निश्चित आहे. त्याचा परिपाक विधान परिषदेच्या आमदारकीत परिवर्तीत होण्याचेही संकेत आहेत.
कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाने आत्तापर्यंत विधानसभेचे तीनच आमदार पाहिले आहेत. त्याला कारणही तसेच आहे.

पहिल्यांदा जेष्ठ नेते यशवंतराव मोहिते यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. त्यानंतर तब्बल सात टर्म म्हणजेच 35 वर्षे सलग माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर या मतदारसंघाचे आमदार राहिले. त्यानंतर त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुक लढली. त्यामध्ये श्री. चव्हाण विजयी होऊन ते कऱ्हाड दक्षिणचे आमदार झाले.  राजकीय संघर्षातून श्री. चव्हाण आणि श्री. उंडाळकर गटात मोठी चुरस पहायला मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांचे आई-वडील खासदार होते. त्यानंतर ते खासदार झाले.

त्या काळातील राजकीय संघर्षातून विलासराव पाटील-उंडाळकर हे बाजुला झाले व त्यांनी आपला स्वतंत्र गट स्थापन केला. त्या माध्यमातून त्यांनी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे आमदार म्हणुन नेतृत्व करताना त्यांना सहकार, दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन या खात्याच्या कॅबिनेट मंत्रीपदावर संधी मिळाली. तर पृथ्वीराज चव्हाण हे दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री म्हणुन कार्यरत होते. त्यामुळे श्री. चव्हाण दिल्लीत आणि उंडाळकर राज्यात आपला बकुब राखुन होते.

पण त्या दोघांच्या गटातील संघर्ष कमी करण्यासाठी कोणीच प्रयत्न केला नाही. त्याचा जिल्ह्यातील काँग्रेसला फटका बसला. त्यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीसह अन्य निवडणुकांत काँग्रेस पक्षाकडुन उमेदवारी मिळवताना मोठ्या अडचणी व्हायच्या. मग अपक्ष उमेदवार उभे करुन ते निवडुन आणण्याचे काम उंडाळकर गटाला करावे लागत होते. त्याचबरोबर मध्यंतरी अॅड. उदयसिंह पाटील यांच्यावर आलेल्या एका संकटावेळीही दोन्ही गटातील संबंध बरेच ताणले होते. त्यानंतर पुलाखालुन बरे पाणी वाहिले.

त्यानंतरच्या काळात बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व नेते उंडाळकरांच्या विरोधात एकत्र आले. त्यावेळीही या दोन्ही गटातील संबंधित टोकाला गेले होते. त्यानंतर उंडाळकर गटाने भोसले गटाच्या मदतीने बाजार समितीतील सत्ता परत मिळवली. 
तर भोसले गटाला कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली. त्यानंतर टप्याटप्याने या दोन्ही गटातील दरी कमी होण्यास सुरुवात झाली. उंडाळकरांचे पुत्र ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आणि मनोहर शिंदे यांनी पुढाकार घेऊन दोन्ही गटातील दरीवर पडदा टाकण्यासाठी प्रयत्न केले.

त्याचा पहिला प्रयोग मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत करण्यात आला. तेथे पहिल्यादांच या निवडणुकीत हे दोन्ही गट एकत्र आले. श्री. चव्हाण गटाचे मनोहर शिंदे यांना ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी साथ दिली. त्यामुळे शिंदे यांचा मलकापुर पालिकेतील विजय सुकर झाला. मलकापूरचा पॅटर्न काँग्रेसच्या उभारणीसाठी कऱ्हाड दक्षिणमध्ये राबवण्याची कार्यवाही तेव्हापासून सुरू झाली. दोन्ही गट एकत्र आल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो, हे मलकापूर पालिकेच्या निवडणुकीतून दिसून आले.


त्यामुळे श्री. चव्हाण गट तेव्हापासून उंडाळकर गटाची फारशी फारकत घेताना दिसून आलेला नाही. आता राज्यातील काँग्रेसमध्ये सरकारमधील हेव्यादाव्यातून वाद सुरू असताना सातारा जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये वैरत्व विसरून दोन काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. काल (सोमवारी) एकाच दिवशी विलासराव देशमुखांचे चिरंजीव वैद्यकिय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख आणि गृहराज्यमंत्री बंटी उर्फ सतेज पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जाऊन
भेट घेतली.

कऱ्हाडात या तीन नेत्यांची कमराबंद खलबते झाली. त्यानंतर सायंकाळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सतेज पाटील यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीतील संदर्भ अनेक असले तरी काँग्रेसचे दोन नेते वैरत्व विसरून पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत मिळाले. सुरवातीला उंडाळकर व पृथ्वीराज चव्हाण यांचे गट वैर विसरले त्यानंतर नेत्यांनी वैरत्व विसरून एकत्र आले आहेत. प्रत्यक्ष येथे काँग्रेस बळकटीकरणासाठी नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. 


विधान परिषदेवर चर्चा नाही....

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर यांची त्यांच्या साताऱ्यातील निवासस्थानी जाऊन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मंत्री सतेज पाटील यांनी भेट घेतली. विधान परिषदेबाबतची कोणतीही चर्चा नव्हती. काँग्रेस पक्ष संघटना बळकट करताना वैरत्व विसरून ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकत्र आणणे हा यामागचा उद्देश होता. यातूनच काँग्रेस पक्षाला पुढची वाटचाल सुखकर होण्यासाठी हा प्रयत्न होता, अशी प्रतिक्रिया ॲड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी दिली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com