चंद्रकांत पाटील यांना बक्षिसाची आठवण तर शेलार करून देत नसतील ना ? - Rupali Chakankar's reply to Ashish Shelar's criticism | Politics Marathi News - Sarkarnama

चंद्रकांत पाटील यांना बक्षिसाची आठवण तर शेलार करून देत नसतील ना ?

महेश जगताप 
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

मागील सरकारच्या काळातील खड्डे दाखवल्याबद्दल बक्षिसाची रक्कम बाकी राहिल्याची आठवण तर चंद्रकांत पाटील यांना शेलार करून देत नसतील ना ? असा प्रश्न  रुपाली चाकणकर यांनी  विचारला आहे.

पुणे : 'रस्त्यात खड्डे दाखवा हजार रुपये मिळावा..' असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी ते सत्तेत असताना केले होते. आशिष शेलार यांनी जरी हा प्रश्न सुप्रिया सुळे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला असला तरी मला वाटतं की मागील सरकारच्या काळातील खड्डे दाखवल्याबद्दल बक्षिसाची रक्कम बाकी राहिल्याची आठवण तर चंद्रकांत पाटील यांना शेलार करून देत नसतील ना ? असा प्रश्न राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी विचारत शेलार यांना कोकणातील रस्त्याच्या अवस्थेवरून केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे कोकणात ये- जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रात खड्ड्यांसोबत सेल्फी काढणारी राष्ट्रवादी या वर्षी मुंबई-गोवा महामार्गावर हा 'स्तुत्य उपक्रम' राबवून आपल्या सरकारच्या चेहऱ्यासमोर आरसा का धरीत नाही ? असा सवाल करीत भाजप नेते शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. 

भाजप सरकारच्या काळात राष्ट्रवादीने खड्ड्यांसोबत सेल्फी काढा, असे आंदोलन केले होते. यावेळी मुंबईसह महाराष्ट्रभरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले तर नाहीच, शिवाय कोकणात जाणारा रस्ता उखडून गेला आहे. मग राष्ट्रवादी आंदोलन का करत नाही ? कोकणातील लोकप्रतिनिधी, चाकरमानी यांचा आवाज सरकारला ऐकू येत नाही का ? असे म्हणत शेलार यांनी खड्ड्यांबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना पत्रही लिहिले आहे. 

याला उत्तर देताना चाकणकर यांनी शेलार यांना रस्त्यावरील पडलेले खड्डे दिसतात. पण महाराष्ट्राच्या हक्काच्या GST चा परतावा न दिल्यामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीला पडलेलं कृष्णविवर दिसत नाहीये, शेलारांनी हीच ताकत महाराष्ट्राच्या हक्काचा पैसा मिळवण्यासाठी लावावी, मग असले टुकार स्टेटमेंट द्यायची वेळ येणार नाही, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.

Edited  by : Mangesh Mahale

हेही वाचा : भाविकांसाठी धार्मिक स्थळं खुली होणार  

पंढरपूर : सरकारकडून मंदिरं खुलं करण्याचं आश्वासन दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. धार्मिक स्थळं खुली करण्याआधी सरकार नियमावली जाहीर करणार असल्याचे आंबेडकरांनी सांगितलं. भाविकांसाठी धार्मिक स्थळं खुली होणार असल्याचं आंबेडकरांनी यावेळी सांगितलं. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी विठ्ठालाचे दर्शन घेतलं. वंचितच्या आंदोलनाना यश आलं, असल्याचं त्यांनी सांगितलं. आंबेडकरांसोबत 15 जणांना मंदिरात जाण्याची परवानगी यावेळी देण्यात आली. लोकभावनेचा आदर केल्यानं सरकारचा आभारी आहे, असे विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख