रितेश देशमुख `लयभारी`; आईच्या जुन्या साडीचे स्वतःसह मुलांना शिवले कुर्ते... - Ritesh Deshmukh `Layabhari`; Created kurtas for children by mother's old sari | Politics Marathi News - Sarkarnama

रितेश देशमुख `लयभारी`; आईच्या जुन्या साडीचे स्वतःसह मुलांना शिवले कुर्ते...

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

गणेशोत्सवात मुलांना मनसोक्त कागदांचे बोळे करायला लावून त्यातून गणपतीची सुबक मुर्ती साकारण्याचा रितेश आणि त्याच्या मुलांचा व्हिडिओ असाच गाजला होता. त्यानंतर या दिवाळीत देखील त्याने `लयभारी`, असे काम केले आहे. नवे कपडे घेण्याऐवजी रितेशने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून स्वतः व मुलांसाठी खास कुर्ते बनवून घेतले आहेत.

औरंगाबाद ः चित्रपट अभिनेता रितेश देशमुख आपल्या कल्पकतेसाठी ओळखला जातो. मग वडील दिवंगत विलासराव देशमुख यांच्या आठवणीने हळव्या झालेल्या रितेशने त्यांच्या कोटचा वापर करत तयार केलेला भावनिक व्हिडिओ असो, की सामाजिक संदेश आणि आरसा दाखवणारा त्याचा `थॅंग गाॅड बाप्पा आपल्या सारखा नसतो`, हा अल्बम असेल. यातून रितेशने आपल्यातील कल्पकतेची झलक दाखवून दिली होती. त्यानंतर दिवाळी निमित्त त्याने व्हायरल केलेला एक व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चिला जात आहे. आईच्या जुन्या साडीतून स्वतःसह मुलांना तयार केलेल्या कुर्त्यांचा हा व्हिडिओ अत्यंत भावनिक आणि आईबद्दलचे प्रेम व्यक्त करणारा आहे. 

सणासुदीच्या काळात काही तरी वेगळं, हटके करण्याचा रितेश देशमुखचा नेहमीच प्रयत्न असतो. गणेशोत्सवात मुलांना मनसोक्त कागदांचे बोळे करायला लावून त्यातून गणपतीची सुबक मुर्ती साकारण्याचा रितेश आणि त्याच्या मुलांचा व्हिडिओ असाच गाजला होता. त्यानंतर या दिवाळीत देखील त्याने `लयभारी`, असे काम केले आहे. नवे कपडे घेण्याऐवजी रितेशने त्याच्या आईच्या जुन्या साडीपासून स्वतः व मुलांसाठी खास कुर्ते बनवून घेतले आहेत. हे कुर्ते परिधान करून रितेश आणि त्याच्या दोन्ही मुलाचा व्हिडिओ त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

`उसने बनाई सबके लिये हॅप्पी दिवाली`, असे म्हणत अत्यंत भावस्पर्शी अशा या व्हिडिओमध्ये रितेशची आई साडी घेऊन दिसून येते आणि नंतर रितेश व त्याची दोन्ही मुलं त्याच साडीतून बनवलेले कुर्ते घालून समोर आलेले दिसतात. ‘आईची जुनी साडी, मुलांसाठी दिवाळीचे नवीन कपडे असे म्हणत रितेशने त्याच्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. रितेश व त्याच्या मुलांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांकडून कमेंट आणि कौतुकाचा वर्षाव देखील होत आहे. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख