Remove Chavan from the post of Maratha Reservation Sub-Committee Chairman: Mete met Ajit Pawar | Sarkarnama

मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्षपदावरुन चव्हाणांना हटवा : मेटेंनी घेतली अजितदादांची भेट 

दत्ता देशमुख, सरकारनामा ब्यूरो 
शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्‍नात आपण स्वत: लक्ष घालून मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री व संबंधितांशी चर्चा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या समितीला दिले. 

बीड : मराठा समाजाचे आरक्षण टिकवणे, सारथी, आरक्षण आंदोलनातील आत्मबलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना घोषणेप्रमाणे नोकरी व रोख मदत द्यावी, आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, आदी मागण्यांसाठी मराठा समन्वय समितीकडून शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुरुवारी मुंबईत भेट घेऊन निवेदन देण्यात आले. 

अजित पवार यांनी समितीकडून केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत, आगामी मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे प्रश्न कसे सोडवता येतील, यासंबंधी तयारी केली जाईल, असे आश्वासन दिले. 

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली सुनावणी, सारथी संस्था, शिवस्मारक, मराठा आरक्षण आंदोलनातील आत्मबलिदान केलेल्या कुटुंबियांना न्याय, आंदोलनातील गुन्हे मागे घेणे, आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटविणे या मागणीसाठी शिवसंग्रामसह इतर संघटनांनी एकत्र येऊन मराठा समन्वय समितीची स्थापना करत सहा ते नऊ ऑगस्ट असे तीन दिवस विविध आंदोलने हाती घेतली आहेत. गुरुवारी राज्यभरातून मराठा समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. 

याचाच एक भाग म्हणून मराठा समन्वय समितीचे अध्यक्ष तथा शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली समितीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या मागण्यांचे निवेदन दिले. मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत मराठा आरक्षणाबद्दल नियोजन करू, कमतरता असेल ते दूर करण्यासाठी स्वत: लक्ष घालू, असे अजित पवार या शिष्टमंडळाला सांगितले. 

मंगळवार आणि बुधवारपर्यंत सरकार काय करतेय याची वाट पाहू, परंतु सरकारच्या कृतीची वाट पाहत असताना आपले आंदोलन सुरुच राहील, असे मेटे या वेळी म्हणाले. 

आमदार मेटे यांच्यासह छावा क्रांतीवीर सेनेचे करण गायकर, छत्रपती युवा सेनेचे गणेश कदम, छावा मराठा युवा संघटनेचे रवींद्र काळे, राष्ट्रीय छावा संघटनेचे गंगाधर काळकुटे, छावा श्रमिक सेनेचे ज्ञानेश्वर गायकवाड, शिवक्रांती सेनेचे संजय सावंत, अखिल भारतीय मराठी युवा परिवारचे शदर तुंगार, बळिराजा शेतकरी संघटनेचे संजय घाटणेकर, अमर चव्हाण, पुंडलिक मालुसरे, बाळा पालकर, सतीश सुर्वे, श्रीराम शिंदे, योगेश विचारे उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख