मातोश्रीच्या बाहेर पडा...राजू शेट्टींची बारामतीत मुख्यमंत्र्यांना हाक...

बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला.
baramati.jpeg
baramati.jpeg

बारामती : दूधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीवरुन माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज बारामतीत मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री जरा डोळे उघडा...मातोश्रीच्या बाहेर पडा, आणि महाराष्ट्रात काय चालले आहे बघा...अलिबाबा आणि चाळीस चोर कशा पध्दतीने चोरी करीत आहेत ते बघा....यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस असे सर्वच पक्ष सहभागी आहेत, तुम्ही आम्ही मावसभाऊ दोघे मिळून वाटून खाऊ....असे सुरु आहे...अशा शब्दात राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्वच राजकीय पक्षांना लक्ष्य केले. 

बारामतीतील शारदा प्रांगणापासून प्रांत कार्यालयापर्यंत तीन गायींसह मोर्चा काढून शेट्टी यांनी आपला निषेध नोंदविला. प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेट्टी म्हणाले, अनेक दूध संघ कागदावरचे असून यांचे लेखापरीक्षण करावे, मी आव्हान देऊन सांगतो 6 एप्रिलपूर्वी यांच्या डेअरीत दूध किती होते ते दाखवावे, 18 रुपयांनी अगदी परराज्यातूनही दूध विकत घेऊन सरकारला ते 25 रुपये लिटरने विकले आहे.

सरकारी दूधखरेदी योजना सुरु झाल्यावरच यांचे दूध कसे वाढले, कागदी मेळ करुन सरकारी तिजोरी लुटण्याचे काम झालेले आहे. यात अनेक मंत्रीही सहभागी आहेत. हे सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर उघड्या डोळ्याने पाहत असतील तर उद्धवसाहेब दूध उत्पादकांनी हातात लोढण का घेऊ नये याचे उत्तर तुम्ही मला द्या, असा सवाल शेट्टी यांनी केला. 

सरकारी खरेदी होऊनही दूधाचे भाव वाढत नसल्याने ही उत्पादकांची फसवणूकच असल्याचा गंभीर आरोप करत शेट्टी यांनी विविध ठिकाणच्या दूध संघांनी दिलेल्या भावांची आकडेवारीच वाचून दाखवली. गोमूत्र व शेणालाही दूधापेक्षा अधिक दर मिळतो, पाण्याची बाटलीही दूधापेक्षा महाग आहे, ही बाब राज्यकर्त्यांना शरम वाटायला हवी, अशी आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. अनेक जण दूध उत्पादकांच्या नावाने दरोडेखोरी करीत आहेत, दूध उत्पादकांच्या हक्काचा पैसा लुटला जात असल्याने आम्ही रस्त्यावर उतरल्याचे शेट्टी म्हणाले. 

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनीही सविस्तर आकडेवारी मांडून दूध उत्पादकांना पाच रुपयांचे अनुदान मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे सांगितले. शांततेच्या मार्गाने बारामतीत येऊन आम्ही घामाचा दाम मागतोय, वेळ पडली तर जहाल आंदोलन उभे करु, असा इशारा त्यांनी दिला. दशरथ राऊत यांनीही या प्रसंगी आपल्या व्यथा मांडल्या. युवा प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम यांनीही आत वेळ पडल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा दिला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com